Grand Commencement of the 24th Continuous Harinam Week and Ram Navami Festival at the Holy Site of Keshavshivani. : श्रीक्षेत्र केशवशिवणी येथे २४ वा अखंड हरिनाम सप्ताह रामनवमी महोत्सवाची भव्य सुरुवात

अमोल साळवे
मलकापूर पांग्रा प्रतिनिधी – : सिंदखेड राजा तालुक्यातील श्रीक्षेत्र केशवशिवणी येथील केशवराज संस्थानच्या वतीने रामनवमी महोत्सवानिमित्त २४ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. वै. ह.भ.प. गुरुवर्य रंगनाथ बाबा उर्फ लहरीबाबा यांच्या कृपाशीर्वादाने हा आध्यात्मिक उत्सव २४ मार्च ते २६ मार्च २०२६ या कालावधीत उत्साहाने साजरा होणार आहे.
समाजात नैतिक मूल्ये रुजवणे, व्यसनमुक्तीचा संदेश देणे आणि सुसंस्कृत नागरिक घडवणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा सोहळा यशस्वी होतो. यंदा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या माध्यमातून भाविकांना ज्ञान आणि भक्तीचा लाभ मिळणार आहे.

कार्यक्रमाचे ठळक मुद्दे:
बुधवार, २५ मार्च: रात्री ८ ते १० वाजेपर्यंत ह.भ.प. गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर महाराज झगरे गुरुजी (वागदकर) यांचे कीर्तन.
गुरुवार, २६ मार्च: सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत कीर्तन, दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत ह.भ.प. गुरुवर्य श्री रमेश महाराज जायभाये (वैष्णव होईल) यांचे काल्याचे कीर्तन. त्यानंतर महाप्रसाद वितरण (ह.भ.प. गुरुवर्य त्र्यंबकबुवा सानप गुरुजी, श्रीक्षेत्र वैष्णवगड यांच्या शुभहस्ते). दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत ह.भ.प. गुरुवर्य श्री प्रेमानंद महाराज देशमुख (पांगरी फाटा) यांचे राम जन्माचे विशेष कीर्तन.
अन्नदाते नारायणराव बंडुजी उदावंत व त्यांच्या कुटुंबीयांच्या सेवेतून महाप्रसाद वाटप होईल. केशवराज संस्थानचे अध्यक्ष वसंतराव नारायणराव उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ आणि परिसरातील भजनी मंडळे यशस्वीतेसाठी झटत आहेत.
या मंगलमय आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


