Grand Yoga Festival at Lonar : लोणार येथे भव्य योग महोत्सव; ६ हजार साधकांनी एकत्रित त्रिकोणासन करत केला विक्रम

बुलढाणा, दि. ७ : बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात आयोजित भव्य योग महोत्सवाचा शुभारंभ केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उत्साहात झाला. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमात तब्बल ६ हजार योगसाधकांनी एकाच वेळी त्रिकोणासन करून विक्रम नोंदवला.
यावेळी बोलताना प्रतापराव जाधव यांनी योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन साधणारी समग्र जीवनशैली असल्याचे सांगितले. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांती, शारीरिक सुदृढता आणि सकारात्मक दृष्टीकोन मिळवण्यासाठी योग अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि तणाव यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित योगाभ्यास उपयुक्त ठरतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी बातम्या वाचण्यासाठी लिंक ला टच करा https://mahadesha.com/
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६च्या अनुषंगाने सुरू असलेल्या १०० दिवसांच्या काउंटडाउनमधील ७५ व्या दिवशी हा योग महोत्सव पार पडला. या वेळी ६ हजार साधकांनी एकाच वेळी त्रिकोणासन सादर करत ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. या कामगिरीची अधिकृत नोंद Asia Book of Records आणि India Book of Records मध्ये करण्यात आली.
या प्रसंगी आयुष विभागाच्या सहसचिव मोनालिसा दास, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, माजी आमदार संजय रायमुलकर, तसेच स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा विक्रम ‘स्वस्थ भारत, विकसित भारत’ या संकल्पनेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. विक्रम नोंदणीचे प्रमाणपत्रही यावेळी केंद्रीय मंत्र्यांना प्रदान करण्यात आले.


