Health awareness through public participation : लोकसहभागातून आरोग्याचा जागर ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला आजपासून प्रारंभ

बुलढाणा : ग्रामीण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधत नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात आज दि. 1 एप्रिलपासून होणार असून, लोकसहभागातून व्यापक आरोग्य चळवळ उभी करण्याचा शासनाचा मानस आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकारातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने 10 फेब्रुवारी 2026 रोजी या अभियानास मान्यता दिली आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त व स्वयंपूर्ण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, गावापासून राज्यस्तरापर्यंत आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण होणार आहे. तळागाळातील नागरिकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे.
या अभियानाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधावर अधिक भर. स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण, माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पातळीपर्यंत सर्व यंत्रणा सक्रिय सहभागी होणार आहेत.
सुदृढ गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब : या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व ग्रामस्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ठरवलेल्या निकषांनुसार 70 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून गौरविण्यात येणार असून, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी राज्य शासनाने 80.75 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
2 ते 5 कोटींचे आकर्षक पुरस्कार : राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांना प्रथम क्रमांकासाठी 5 कोटी, द्वितीयसाठी 3 कोटी व तृतीयसाठी 2 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. पंचायत समिती स्तरावरही 2 कोटी, 1.5 कोटी व 1.25 कोटी रुपयांची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपआरोग्य केंद्रांसाठीही लाखोंच्या पारितोषिकांची तरतूद आहे. गावांनाही जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर अनुक्रमे 25 लाख, 1 कोटी व 5 कोटी रुपयांपर्यंत पुरस्कार मिळणार आहेत.
दरवर्षी स्पर्धात्मक अंमलबजावणी : हे अभियान दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत राबवले जाणार असून, गावांना सातत्याने आपली कामगिरी सुधारण्याची संधी मिळणार आहे.
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान केवळ सरकारी योजना नसून एक सामाजिक आरोग्य चळवळ ठरणार आहे. लोकसहभाग, स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयी यांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्र अधिक सुदृढ, सक्षम आणि निरोगी करण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.


