If I were an MLA, I would be sleeping under a JCB! : जनतेच्या समस्या सहज सोडविल्या जात नसतील तर आक्रमक बनावे लागते, असा कानमंत्र माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांना दिला.
माजी राज्यमंत्री सुबोध सावजींचा जनहितासाठी आमदार खरात यांना कानमंत्र
मेहकर मतदारसंघातील समस्या सुटतील कधी? आमदारांना सवाल
मेहकर : जनतेच्या समस्या सहज सोडविल्या जात नसतील तर आक्रमक बनावे लागते, असा कानमंत्र माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांना दिला.

आमदार सिद्धार्थ खरात यांच्या कार्यालयामध्ये गुरुवारी सावजी धडकले. यावेळी त्यांनी मेहकर मतदार संघात निर्माण झालेल्या वेगवेगळ्या समस्या कधी सुटतील या संदर्भात आमदार खरात यांना विचारणा केली. तर मी एक माजी मंत्री म्हणून नव्हे तर एक मतदार म्हणून आपल्याकडे आलो आहे, असे असेही सुबोध सावजी यावेळी म्हणाले.
माझ्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी मी वीज कंपनीचे हायपॉवरचे टॉवर कापले होते. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. मात्र मी शेतकरी व नागरिकांसाठी सदैव आंदोलने केली. मेहकर शहराचे जेव्हा अतिक्रमण पाडण्यात आले. जर मी आमदार असतो तर अतिक्रमण काढणाऱ्या जेसीबीखाली झोपलो असतो व गोरगरिबांचे अतिक्रमण वाचविले असते. मात्र आता सध्याच्या परिस्थितीत मेहकर मतदारसंघात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या वाढत आहेत. अशा स्थितीत आमदार म्हणून आपण काय करणार आहात समस्या कधी सुटतील, असा प्रश्न सावजी यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांना विचारला.
मेहकर मतदारसंघात पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या. मात्र त्या योजनांचा कुठेच गावकऱ्यांना फायदा होत असल्याचे दिसून येत नाही. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये खेडेगावमध्ये पाणीटंचाई कायमच आहे. पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. पाइपलाइन केली आहे. मात्र त्यामध्ये पाण्याचा पत्ताच नाही. रस्त्याची दयनीय अवस्था आहे. ग्रामीण भागात अनेक गोरगरिबांच्या जागा अतिक्रमित आहेत. आठ. अ च्या नक्कल वर सरकारी शब्द लिहून येत आहे त्यामुळे अनेकांना शासनाच्या योजनांचा अथवा घरकुलाचा लाभ मिळत नाही त्यामुळे ही अतिक्रमित जागा मालकीची कधी होणार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार, जानेफळ लोणी गवळी मार्गे विश्विकडे जाणारा भला मोठा सिमेंटचा रस्ता तयार होत आहे. मात्र अतिशय महत्त्वाचा असलेला मेहकर डोणगाव रस्ता सिमेंटचा व रुंदीकरण का होत नाही, असे वेगवेगळे प्रश्न सावजी यांना विचारण्यात आले.
सावजी यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांना विचारले असता त्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले, मला जेमतेम एक वर्ष झाले आहे. अजून मला थोडा वेळ द्या. मी विरोधी पक्षाचा आमदार आहे त्यामुळे निधी आणण्यासाठी अडचणी निर्माण होतात ह्या समस्या अगोदरच्या आहेत व भरपूर समस्या आहेत त्यामुळे त्या सोडविण्यासाठी वेळ लागणार आहे मात्र मी माझ्या परीने सतत प्रयत्नशील आहे यासह इतरही वेगवेगळ्या विषयावर माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी व आमदार सिद्धार्थ खरात यांची मेहकर मतदार संघातील समस्या संदर्भात चर्चा झाली. यावेळी शैलेश सावजी यांच्यासह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

