Illegal businesses flourish in Mehkar; crime increases : मेहकर शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण आले आहे. यामुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचत आहे. त्यामुळे अवैध धंदे वाल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार संजय रायमूलकर यांनी केली आहे.

माजी आमदार संजय रायमूलकर यांचे पोलीस प्रशासनाला पत्र
मेहकर : मेहकर शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण आले आहे. यामुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचत आहे. त्यामुळे अवैध धंदे वाल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार संजय रायमूलकर यांनी केली आहे.
यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांच्यासह मेहकर, डोणगाव व जानेफळ पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना रायमूलकर यांनी पत्र पाठवले आहे. जुगार, अवैध दारू विक्री, वरली मटका आणि तत्सम अनेक बेकायदेशीर धंद्यांना तालुक्यात उत आला आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यामुळे तरुण पिढी बरबाद होण्याची भीती निर्माण झाली आहे. गरीब कुटुंबांचे आर्थिक नुकसान होत असून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. बेकायदेशीर अवैध व्यवसायांमुळे वारंवार भांडणे, गुन्हेगारी प्रकारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या संदर्भात तत्काळ कारवाई करून हे अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करून अवैध धंदे वाल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रायमूलकर यांनी केली आहे.
या पत्राच्या प्रति मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री मकरंद पाटील, पोलीस महासंचालक, अतिरिक्त पोलीस महासंचालक अमरावती, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठविल्या आहेत.


