Improve your work : शेगाव दौऱ्यावर असताना मध्येच खामगाव नगरपालिकेला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. अचानक भेटीमुळे कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना : खामगाव पालिकेला अचानक भेट
खामगाव : शेगाव दौऱ्यावर असताना मध्येच खामगाव नगरपालिकेला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. अचानक भेटीमुळे कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली. विकास कामांची पाहणी करीत असताना कामात सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला निर्माणाधीन स्व. भाऊसाहेब फुंडकर सांस्कृतिक सभागृहाच्या इमारतीला भेट दिली. यावेळी त्यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेत बांधकाम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर नटराज बागेतील विस्तारीकरणाच्या कामाची पाहणी केली. बागेतील कामाच्या दर्जाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करीत कामाची गती कायम राखण्याचे निर्देश दिले.
नगरपालिकेच्या विविध विभागांना भेटी देऊन डॉ. पाटील यांनी दैनंदिन कामकाजाची माहिती घेतली. विशेषतः जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील प्रलंबित प्रकरणांबाबत आढावा घेतला. कामकाजात पारदर्शकता ठेवून सर्वसामान्यांची कामे प्राधान्याने कर्मचारी मार्गी लावावीत, अशा सूचना करण्यात आल्या. या आकस्मिक भेटीवेळी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्यासह पालिकेचे विविध विभागप्रमुख उपस्थित होते.


