India’s Gold Victory in Asian Lacrosse : ऐशियन लेक्रॉसमध्ये भारताचा सुवर्ण विजय

बुलढाणा (प्रतिनिधी) : – ऐशियन लेक्रॉस स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या भारतीय संघाचा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला. या गौरव सोहळ्यात खेळाडूंशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
ऐशियन लेक्रॉस स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धा साऊदी अरेबियातील रियाद येथे १ ते ६ फेब्रुवारीदरम्यान पार पडल्या. या स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ करत अंतिम सामन्यात इराकवर ९-२ असा दणदणीत विजय मिळवला आणि अजिंक्यपद पटकावले. या विजयामुळे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
या स्पर्धेत देशभरातून निवडलेल्या १८ खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आणि निर्णायक सामन्यात वर्चस्व राखत सुवर्णपदक पटकावले.
विजेत्या संघाला आमंत्रित करून प्रतापराव जाधव यांनी सर्व खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी त्यांनी खेळाडूंशी संवाद साधताना सांगितले की, “भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावले आहे. तुमची ही कामगिरी प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे.”
भारत आज प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असून क्रीडा क्षेत्रातही देशाचा झेंडा उंचावत आहे. खेळाडूंनी केलेली ही उल्लेखनीय कामगिरी भविष्यातील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
या सत्कार सोहळ्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनीही देशासाठी भविष्यात अधिक मोठ्या यशाची हमी दिली. एकूणच, ऐशियन लेक्रॉस स्पर्धेतील भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे क्रीडा क्षेत्रात देशाची पत अधिक उंचावली असल्याचे चित्र दिसून येत आहे.


