mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बेलगावमध्ये रेड ४ कांद्याचा प्रेरणादायी प्रयोग : Inspiring experiment with Red 4 onions in Belgaum

शेअर करा :

Inspiring experiment with Red 4 onions in Belgaum : मेहकर : तालुक्यातील बेलगाव येथे प्रगतिशील शेतकरी भागवतराव आश्रुजी वानखेडे यांनी ११ एकरांवर रेड–४ या कांद्याच्या वाणाची लागवड करून परिसरातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. या यशस्वी प्रयोगाची दखल घेत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी भागवतराव वानखेडे यांच्या शेताला प्रत्यक्ष भेट दिली.

हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केली पाहणी

मेहकर : तालुक्यातील बेलगाव येथे प्रगतिशील शेतकरी भागवतराव आश्रुजी वानखेडे यांनी ११ एकरांवर रेड–४ या कांद्याच्या वाणाची लागवड करून परिसरातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. अनिश्चित हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि अस्थिर बाजारभाव या तिहेरी आव्हानांमध्येही योग्य वाणाची निवड आणि नियोजनबद्ध शेती केल्यास भरघोस उत्पन्न मिळू शकते, याचे हे ठोस उदाहरण ठरत आहे. या यशस्वी प्रयोगाची दखल घेत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी भागवतराव वानखेडे यांच्या शेताला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी कांद्याच्या पिकाची सखोल पाहणी करत वाढीची स्थिती, कांद्याचा आकार, रंग, साठवण क्षमता आणि एकूण गुणवत्ता यांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हवामानातील सतत बदल लक्षात घेऊन पिकांची निवड व व्यवस्थापनात दूरदृष्टी ठेवण्याचा सल्ला दिला. वानखेडे यांनी वैजापूर तालुक्यातील नांदगावचे शेतकरी व सरपंच शरद नारायण कोल्हे यांच्याकडून (नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च सेंटर, लासलगाव-चित्तेगाव) रेड–४ वाणाचे कांदे (डोंगळे ) उपलब्ध करून घेतले. या वाणाची वैशिष्ट्ये सांगताना कोल्हे यांनी स्पष्ट केले की, रेड–४ कांद्याची टिकवण क्षमता तब्बल दहा महिने असून हा चार पत्तीचा, सशक्त आणि दर्जेदार वाण आहे. बाजारपेठेत एक नंबर व दोन नंबर वर्गवारीत या कांद्याला चांगली व स्थिर मागणी व भाव मिळतो. त्यामुळे साठवणूक करून विक्री करण्याचा पर्याय तसेच सदर वान एकरी २५० क्विंटलपर्यंत उत्पादन क्षमता आहे, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो. शेतभेटीदरम्यान पंजाबराव डख यांनी उत्पादन खर्च कमी करण्यावर विशेष भर दिला. शास्त्रशुद्ध पाणी व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर आणि योग्य वेळेवर रोगनियंत्रण केल्यास उत्पादनात वाढ होऊन नफा निश्चित होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच बाहेरील महागडी बियाणे खरेदी करण्याऐवजी निवडक व प्रमाणित घरगुती बियाण्याचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

या कार्यक्रमास वसंतराव नाईक प्रगतशील शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रितेश डहाके, प्रमोद जाधव, मारुती प्रल्हाद बोरकर, डॉ. नामदेव आश्रुजी वानखेडे तसेच गावातील प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांदा पिकातील साठवण तंत्रज्ञान, बाजारपेठेतील दरनियोजन आणि हवामानानुसार पिक व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. रेड–४ वाणाच्या यशस्वी लागवडीमुळे बेलगावसह महाराष्ट्रातील विशेष वैजापूर व लासलगाव तालुक्यातील कांदा उत्पादकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. बदलत्या हवामानातही धाडसी निर्णय, शास्त्रशुद्ध पद्धती आणि नियोजनबद्ध शेती यामुळे शेतीत यश मिळवता येते, हा आत्मविश्वास या प्रयोगातून बळकट झाला आहे. आगामी हंगामात अधिकाधिक शेतकरी या वाणाकडे वळण्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top