Interim Seniority List of TET-CTET Qualified Teachers Released : टीईटी-सीटीईटी उत्तीर्ण शिक्षकांची अंतरिम ज्येष्ठता यादी जाहीर २७ मार्चला विशेष कार्यशाळा.

बुलढाणा : – बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत टीईटी (TET) व सीटीईटी (CTET) उत्तीर्ण शिक्षकांची पदोन्नतीसाठीची अंतरिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात आली असून, यादीतील त्रुटी व आक्षेप नोंदवण्यासाठी २७ मार्च २०२६ रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या २४ मार्च २०२६ च्या पत्रानुसार ही तात्पुरती यादी जाहीर करण्यात आली आहे. २५ मार्चपासून ही यादी सर्व पंचायत समित्या, गटसाधन केंद्रांच्या नोटीस बोर्डांवर तसेच शिक्षकांच्या व्हॉट्सॲप गटांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या यादीत नाव, माहिती किंवा इतर बाबींमध्ये त्रुटी असलेल्या शिक्षकांना दुरुस्ती करण्याची संधी देण्यासाठी २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत संबंधित शिक्षकांनी आवश्यक कागदपत्रे व लेखी अर्जासह प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ज्या शिक्षकांनी अद्याप गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केलेले नाहीत, त्यांनीही या कार्यशाळेत सहभागी होऊन आपली माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी किंवा त्यांच्या प्रतिनिधींना या प्रक्रियेत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या कार्यशाळेनंतर सर्व दुरुस्त्या आणि आक्षेपांचा निपटारा करून शिक्षकांची अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. एकदा अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आक्षेप स्वीकारले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, विकास पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांना आवाहन केले आहे की, या संधीचा लाभ घेऊन आपल्या सेवाविषयक माहितीत कोणतीही त्रुटी राहू नये याची खातरजमा करून घ्यावी.


