mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

जिल्हा परिषद शाळांच्या नवपरिवर्तनासाठी झेप उपक्रमाची सुरुवात : Leap Initiative for School Innovation

शेअर करा :

Leap Initiative for School Innovation : जिल्हा परिषद शिक्षकांची नाविन्यपूर्ण उपक्रमशीलता ही सृजनशील संशोधनाचेच एक रूप असून, या माध्यमातून आगामी शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषद शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी व्यक्त केला.

 

शिक्षकांची उपक्रमशीलता म्हणजे सृजनशील संशोधन : मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात

बुलढाणा : जिल्हा परिषद शिक्षकांची नाविन्यपूर्ण उपक्रमशीलता ही सृजनशील संशोधनाचेच एक रूप असून, या माध्यमातून आगामी शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषद शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी व्यक्त केला.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा नियोजन सभागृहात झेप या अभिनव संकल्पनेतून जिल्ह्यातील १५० नाविन्यपूर्ण शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. मारुती गायकवाड, व्याख्याते गजानन राऊत, उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, शेख अकिल आदी मान्यवर उपस्थित होते.

गुलाबराव खरात पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद शिक्षक विविध प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. मात्र या उपक्रमांना व्यापक व्यासपीठ मिळत नाही. झेप उपक्रमाच्या माध्यमातून अशा उपक्रमांचे आदानप्रदान करून एका शाळेतील चांगले प्रयोग दुसऱ्या शाळेत पोहोचवण्याची व्यवस्था निर्माण केली जाणार आहे.

प्रास्ताविकात प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. प्रशासन शिक्षकस्नेही राहील, तर शिक्षकांनी विद्यार्थीस्नेही बनून शाळांचा पट वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. जगराम भटकर यांनी मार्गदर्शन केले, तर गजानन राऊत यांनी प्रेरणादायी उद्बोधन केले. कार्यशाळेत निवडक शिक्षकांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले.

 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे यांनी केले, तर आभार उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top