Malkapur Crime : Cash worth 47 lakhs seized
शनिवारी रात्रीपासून ते रविवारी पहाटेपर्यंत पोलिसांनी केलेल्या वाहन तपासणीदरम्यान दोन कारमधून नेण्यात येणारी ४६ लाख ७८ हजार रुपयांची रोकड पकडण्यात आली. मलकापूर शहरातील तहसील चौकात ही कारवाई करण्यात आली.

बुलढाणा : शनिवारी रात्रीपासून ते रविवारी पहाटेपर्यंत पोलिसांनी केलेल्या वाहन तपासणीदरम्यान दोन कारमधून नेण्यात येणारी ४६ लाख ७८ हजार रुपयांची रोकड पकडण्यात आली. मलकापूर शहरातील तहसील चौकात ही कारवाई करण्यात आली.
मलकापूर शहरातील तहसील चौकात नाकेबंदी करून पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी सुरू केली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, शहरचे ठाणेदार गणेश गिरी, पीएसआय प्रशांत झेडगे, पोलीस शिपाई तायडे यांच्यासह पोलीस कर्मचारी व आरसीपी पथकाचे जवान तपासणी करीत असताना पहाटे एक वाजता मुक्ताईनगर रोडकडून आलेली एमएच-२१-बीडब्ल्यू-३३७८ क्रमांकाची कार थांबविण्यात आली. डिक्कीत ठेवलेल्या बॅगमध्ये २० लाख रुपये सापडले. वाहनमालक जगदीश तारचंद गिरणीवाले (५८, देऊळगाव राजा) यांच्या परवानगीने कारची झडती घेण्यात आली. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
तर १८ जानेवारीला पहाटे एमएच-२१-डीक्यू-८४७४ या वाहनाची तपासणी केली असता २६ लाख ७८ हजार ८५० रुपये आढळून आले. वाहनमालक सलीम खान नइम खान (वय ४१, धाड, ता.जि. बुलढाणा) यांच्या संमतीने तपासणी करण्यात आली. मलकापूर शहर पोलिसांनी जप्त केलेली रक्कम बुलढाणा येथील जिल्हा कोषागार कार्यालयात जमा केली आहे.
आयकर विभागाशी संपर्क
अकोला येथील आयकर अधिकारी, अमरावती आयकर विभागाचे सहाय्यक संचालक, सहाय्यक आयुक्त आणि खामगाव येथील आयकर कार्यालयाकडे जप्त केलेल्या नोटांसंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

