Mistry dies after falling from second floor : स्लॅब टाकण्याच्या दिवशी सेंट्रिंगचे काम करीत असताना दुसऱ्या मजल्यावरून जमिनीवर कोसळल्याने एका मिस्त्रीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
स्लॅबच्या कामावेळी सेंट्रिंगचे काम करताना दुर्दैवी घटना : इमारत बांधकाम करताना काळजी घेण्याची गरज

बुलढाणा : इमारत व इतर बांधकाम करणाऱ्या मिस्त्री व कामगारांसाठी ही दुःखद बातमी आहे. स्लॅब टाकण्याच्या दिवशी सेंट्रिंगचे काम करीत असताना दुसऱ्या मजल्यावरून जमिनीवर कोसळल्याने एका मिस्त्रीचा दुर्दैवी मृत्यू झाला. १० एप्रिल रोजी शहरातील भीमनगरमध्ये ही घटना घडली.
कडूबा नाथा झिने (वय ४८) असे मृत मिस्त्रीचे नाव आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील क्रांतीनगरमधील रहिवासी असलेले कडूबा झिने यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह मिस्त्री कामाच्या भरवशावरच चालतो. वॉर्ड क्रमांक दोनमधील भीमनगरमध्ये संजय जाधव यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. १० एप्रिल रोजी घराच्या स्लॅबचे काम होते. त्याठिकाणी झिने हे सेंट्रिंगचे काम करीत होते. अचानक दुसऱ्या मजल्यावरून ते जमिनीवर कोसळले. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांचा आधार हिरावल्या गेला आहे. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
घटनेनंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकुल वातावरणात कडूबा झिने यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
काम करताना सावधगिरी बाळगण्याची गरज
बांधकाम करताना वरून कोसळून मिस्री तसेच मजुरांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर काम करीत असताना वीज वाहिनीला स्पर्श झाल्यानेदेखील अशा दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे जीव सांभाळून काम करण्याची गरज व्यक्त होत आहे.


