New District Collector accorded a rousing welcome in Buldhana. : बुलढाण्यात नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत


बुलढाणा : जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 6 एप्रिल रोजी मावळते जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला, तर नूतन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे प्रशासनाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. मावळत्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केलेली विकासकामे अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प डॉ. देवरे यांनी व्यक्त केला.
दिमाखदार सोहळ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, डॉ. पाटील यांच्या पत्नी शीला पाटील, तसेच सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नूतन जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी यावेळी म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यातील पूर्वीचा कामाचा अनुभव गाठीशी असल्याने मला येथील परिस्थितीची जाण आहे. आगामी काळात निर्यात, कृषी, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांवर विशेष भर देऊन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा मानस आहे. डॉ. पाटील यांनी घडवलेली अधिकाऱ्यांची टीम जबरदस्त असून, त्यांच्या सहकार्याने विकासाचा ध्यास पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मावळते जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आपल्या निरोपपर भाषणात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या एकजुटीचे आणि कार्यपद्धतीचे कौतुक केले. ते म्हणाले आज महाराष्ट्रात बुलढाणा जिल्हा विकासकामांमध्ये अग्रेसर आहे, असे त्यांनी अभिमानाने सांगितले. अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी कामाचे नियोजन, पूर्वतयारी, पारदर्शकता आणि नियमित वृत्तपत्र वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. पशुसंवर्धन आयुक्तपदी पदोन्नतीबद्दल बोलताना, मुक्या प्राण्यांची सेवा ही पुण्याची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
डॉ. पाटील यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार, महसूल सुधारणा, लोणार सरोवर संवर्धन आणि दस्तावेजांचे डिजिटायझेशन, महसूल मित्र, सुलभ चॅटबॉट सेवा, ई-महसूल, डॅशबोर्ड, सहज प्रणाली इ. सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जिल्ह्याने लक्षणीय प्रगती साधली आहे. स्वागत व निरोप सभारंभाला उपस्थितांनी डॉ. किरण पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत नूतन जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महसूल तहसीलदार वृषाली केसकर यांनी केले.
डॉ. प्रविणकुमार पितांबर देवरे यांची उल्लेखनीय कारकीर्द
बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार पितांबर देवरे(IAS-2013) यांनी आपल्या प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करत राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कारकीर्दबाबतची माहिती याप्रमाणे:
डॉ. देवरे यांनी B.V.Sc. & A.H. ही शैक्षणिक पात्रता प्राप्त करून 2013 साली भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) प्रवेश केला. यापूर्वी ते आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, पुणे या पदावर कार्यरत होते.
डॉ. देवरे यांनी कारकीर्दीची सुरुवात 1996 साली परीविक्षाधीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी, भंडारा येथे केली. त्यानंतर राजुरा (चंद्रपूर) व अकोला येथे उपविभागीय अधिकारी, बुलढाणा येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून 2004 ते 2007 या कालावधीत निवासी उपजिल्हाधिकारी होते. नाशिक येथे सहआयुक्त तर अहमदनगर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्या. तसेच सोलापूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, PMRDA पुणे येथे अतिरिक्त आयुक्त, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात उपआयुक्त(GAD) तसेच CVC पुणे येथे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
आयएएस अधिकारी म्हणून त्यांनी संचालक ओबीसी पुणे, CMD, MSWC पुणे व पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त या पदांवर कार्य करताना महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. डॉ. देवरे यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन विभागाने “Animal Husbandry Infrastructure Development Fund (AHIDF)” योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्याला प्रथम क्रमांक मिळवून दिला आहे. तसेच “21 वी पशुगणना” निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा https://mahadesha.com/
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजन अधिकारी म्हणून काम केले असून, JNNURM अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 8000 घरांची उभारणी केली आहे. PMRDA क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 1 लाख घरांचे नियोजन करण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. याशिवाय, आपत्ती व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक म्हणून त्यांनी कार्य केले असून, अहमदनगर व सोलापूर येथे राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनासाठी मध्यस्थ म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमातील सर्व 18 तांत्रिक बाबींची पूर्तता त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच विभागाच्या इतिहासात प्रथमच ACAHs व LDOs यांची समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबविण्यात आली. अकोला येथे महसूल कामकाज व पूर व्यवस्थापनासाठी “सर्वोत्कृष्ट महसूल अधिकारी” पुरस्काराने 2004 मध्ये सन्मानित करण्यात आले आहे.


