Obscene gestures with masters students : तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनींशी नराधम शिक्षकाने अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना बुधवार, ८ एप्रिल २०२६ सकाळी रोजी घडली.

संतप्त ग्रामस्थांनी विकृत मास्तरला चोपले : गुरु – शिष्याच्या नात्याला काळीमा : लोणी गवळी येथील घटना
आसिफ शाह
मेहकर : तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनींशी नराधम शिक्षकाने अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना बुधवार, ८ एप्रिल २०२६ सकाळी रोजी घडली. हे प्रकरण समजताच संतप्त ग्रामस्थांनी शाळा गाठून मास्तरला चांगलेच बदलून काढले. मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथे ही घटना घडली. जून महिन्यामध्ये हा शिक्षक सेवानिवृत्त होणार होता. मात्र त्याने विद्यार्थिनींची असभ्य वर्तन करून आपले उर्वरित आयुष्य बरबाद करून घेतले.
महादेव आत्माराम मानतोडे (वय ५८) असे या विकृत शिक्षकाचे नाव आहे. लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकाने तिसऱ्या वर्गातील तीन मुलींचा विनयभंग केला. मागील काही काळापासून त्याच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या काही मुलींसोबत हे घाणेरडे कृत्य या शिक्षकाने केले. या प्रकाराबद्दल कुठे काही वाच्यता केल्यास तो जीवाने मारण्याच्या धमक्या द्यायचा. यामुळे भयभीत झालेल्या मुलींनी ही घटना कोणाला सांगितली नाही. दरम्यान, ८ एप्रिल रोजी या विकृताने तीन मुलींसोबत लैंगिक चाळे केले. त्यांना कपडे उतरायला लावले. शिक्षकाच्या या कृत्याबद्दल मुलींनी आपल्या आई, वडिलांना ही घटना सांगितली. संतापलेल्या पालकांनी सकाळी दहा वाजता शाळा गाठून मास्तरची चांगलीच धुलाई केली.
घटनेबद्दलची माहिती समजताच डोणगाव पोलीस स्टेशनचे डोणगाव ठाणेदार अमरनाथ नागरे आपल्या सहकाऱ्यांसह शाळेत पोहोचले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे हेदेखील दाखल झाले. राखीव पोलीस दलसुद्धा पोहोचले. यावेळी शाळा आणि गावात तणाव निर्माण झाला. उपविभागीय अधिकारी खाडे यांनी पालकांची समजूत काढली. यावेळी आरोपी मास्तरला डोणगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
येत्या तीन महिन्यांनी जूनमध्ये हा शिक्षक सेवानिवृत्त होत आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्याने विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.


