Orders issued to keep slaughterhouses and meat shops closed in the district on March 31st on the occasion of Mahavir Jayanti. : महावीर जयंतीनिमित्त ३१ मार्च रोजी जिल्ह्यात कत्तलखाने व मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश

बुलढाणा : जैन धर्माचे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती ३१ मार्च २०२६ रोजी साजरी होणार असून, या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार, मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात सर्व कत्तलखाने, मांसविक्रीची दुकाने आणि अंडाविक्री केंद्रे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महावीर जयंती उत्सवाच्या काळात समाजात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि धार्मिक सलोखा टिकून राहावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील मुख्याधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये बुलढाणा, चिखली, देऊळगांव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगांव, शेगांव, संग्रामपूर आणि जळगांव जामोद या सर्व तालुक्यांचा समावेश आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये या दिवशी मांसविक्री होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभाग आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.


