Outrageous : Child abuse : हतेडी येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी संतापाने मुठी आवळाव्यात अशी घटना घडली. परप्रांतीय मजुराने आपल्याच सहकाऱ्याच्या पाचवर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला.

हतेडीतील मेडिकल कॉलेजच्या बांधकामावरील घटना
बुलढाणा : शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या हतेडी येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत ठिकाणी संतापाने मुठी आवळाव्यात अशी घटना घडली. परप्रांतीय मजुराने आपल्याच सहकाऱ्याच्या पाचवर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. मुलीस होणारा रक्तस्त्राव पाहता आपली कुकर्म समोर येईल या भीतीने आरोपीने मुलीचे अपहरण करून तिला मलकापूर रेल्वे स्टेशनपर्यंत नेले. मात्र, इकडे तोपर्यंत पोलिसांनी तांत्रिक तपासावर आरोपीचे लोकेशन मिळविले आणि त्याला मोठ्या शिताफीने पकडत बेड्या ठोकण्यात आल्या.
शहरात मेडिकल कॉलेज असावे ही कित्येक वर्षांपासूनची मागणी होती. अखेर मान्यता मिळाली. हतेडी येथे प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आहे. सॅम इंडिया कंपनीने बांधकामावर परप्रांतीय मजुरांना आणले आहे. कामावरच मजुरांचे कुटुंबीय राहतात. २८ जानेवारी रोजी दुपारी पाचवर्षीय मुलगी एकटीच असताना आरोपी संतोष ब्रिजपाल भोईया (वय २५, चरकील, जि. पलामु, झारखंड) याने मुलीवर बलात्कार केला. घटनेनंतर मुलगी अत्यवस्थ झाली. अधिक रक्तस्त्राव झाल्याने आरोपीने आपण पकडल्या जाऊ या भीतीपोटी मुलीस सोबत घेतले आणि मलकापूर रेल्वे स्टेशन गाठले. मुलगी नजरेस पडत नाही म्हणून आई-वडिलांनी शोधाशोध केली. मुलगी दिसत नाही आणि आरोपीही कामावर नसल्याने त्याच्याविरुद्ध संशय घेत तक्रार दाखल केली. बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर ठाणेदार गजानन कांबळे यांनी तत्काळ जिल्हाभरातील पोलिसांना अलर्ट केले. तसेच एक पथक आरोपीच्या मागावर पाठविण्यात आले. मलकापूर रेल्वे स्टेशनवर लोकेशन मिळताच आरोपीला मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. तसेच चिमुकल्या मुलीची सुटका करण्यात आली.
आरोपीविरुद्ध बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. दोन दिवसांचा पीसीआर मिळाल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
या घटनेनंतर मुलीस रक्तस्त्राव होऊ लागल्याने अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

मेडिकल कॉलेज परिसराचे छायाचित्र

