Pickup truck blows up; devotee killed : शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी पायी निघालेल्या अकोला जिल्ह्यातील वारकरी तरुणांना भरधाव पिकअपने मागून धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.

रामनवमीनिमित्त शेगावला जाताना अपघात
खामगाव : शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी पायी निघालेल्या अकोला जिल्ह्यातील भाविक तरुणांना भरधाव पिकअपने मागून धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. खामगाव तालुक्यातील संभापूर ते लासुरा फाटादरम्यान २६ मार्चच्या पहाटे साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील वाहळा बुद्रुक येथील काही तरुण शेगाव येथे रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी पायी वारी करीत निघाले होते. गुरुवार, २६ मार्च रोजी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास हे वारकरी संभापूर ते लासुरा फाटादरम्यान शेगाव रोडने जात होते. यावेळी मागून भरधाव वेगात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या एका अज्ञात मालवाहू पिकअपने तीन जणांना जोरदार धडक दिली. यामध्ये चिरडल्या जाऊन हर्षल गजानन फाळके (वय १७ वर्षे, रा. वाहळा बुद्रुक, ता. पातूर) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर शंकर अशोक ठाकरे आणि धनंजय शिवनारायण सिरसाठ हे दोघे गंभीर जखमी झाले. धडक दिल्यानंतर आरोपी पिकअप चालक वाहनासह फरार झाला.
याप्रकरणी उमेश संजय परकाळे (वय १९) याने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६ (१), २८१, १२५ (ए) सह मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गणेश जाधव करीत आहेत.
वहाळा गावावर शोककळा
संत गजानन महाराजांच्या दर्शनानिमित्त तसेच रामनवमीच्या औचित्यावर वहाळा येथून तरुण शेगाव येथे पायीवारी करीत येत असताना घडलेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. तसेच दोघांची प्रकृती गंभीर आहे. वहाळा गावावर शोककळा पसरली आहे.


