Police presence at petrol pumps now : पेट्रोल पंपांवर वाढणाऱ्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पेट्रोल पंपांवर पोलीस बंदोबस्त तैनात करावा, असे पत्र जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

अनुचित घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे एसपींना पत्र : पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याच्या अफवांना पेव : पंपांवर लागल्या वाहनांच्या रांगा
आसिफ शाह
मेहकर : पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या अफवा पसरल्याने वाहनधारकांनी पेट्रोल पंपांवर चिक्कार गर्दी केली आहे. अशा ठिकाणी काही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांवर पोलीस बंदोबस्त तैनात करावा, असे पत्र पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांना दिले आहे. पत्रातील सूचनेनुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पेट्रोल पंपांभोवती आता पोलिसांचा पहारा लागणार आहे.


आखाती देशांमध्ये युद्ध भडकले आहे. त्याचे परिणाम देश, महाराष्ट्र आणि बुलढाणा जिल्ह्यातही दिसून येत आहेत. (महादेशा ब्रेकिंग) सध्या जनतेमध्ये विविध प्रकारच्या अफवा पसरत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपणार असून तुटवडा निर्माण होणार असल्याने आपली गैरसोय होईल या भीतीने पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठ्या गर्दी केली आहे. चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र नजरेस पडत आहे. वाढती गर्दी पाहता पेट्रोल पंपांवर पोलीस बंदोबस्त तैनात करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले आहेत. २६ मार्च २०२६ रोजी पोलीस अधीक्षकांना हे पत्र देण्यात आले. गर्दी पाहता अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासोबतच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर पोलीस नेमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खात्री करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे.
साठा करण्यावर भर
तुटवड्याच्या भीतीने पेट्रोल व डिझेलचा आगाऊ साठा करून ठेवल्या जात आहे. कॅन, बॉटलमध्ये लोक पेट्रोल, डिझेल भरून घेत असल्याचे दिसून येत आहे. ( महादेशा ब्रेकिंग ) त्यासाठी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका : जिल्हाधिकारी
जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाई नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी केले आहे.


