Revenue Satisfaction Camp : दुसरबीड येथे १० एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता महसूल समाधान शिबिर पार पडणार आहे.
नागरिकांच्या तक्रारींचा जागेवर निपटारा

दुसरबीड : येथे १० एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रलंबित महसुली व विविध शासकीय कामांचे त्वरित निवारण करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अजित दिवटे यांनी दिली.
या शिबिरात नागरिकांना उत्पन्न, रहिवासी, जात तसेच नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ७/१२, ८-अ उतारे, फेरफार आणि जमीन नोंदी संदर्भातील विविध कामेही याठिकाणी मार्गी लावली जाणार आहेत. यासोबतच विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ घेण्याची संधी नागरिकांना मिळणार असून, आलेल्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे. या शिबिरासाठी सर्व नागरिक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः ज्यांची कामे प्रलंबित आहेत अशा लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, त्याबाबतचे प्रशिक्षण आज दुसरबीड महसूल मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व ग्राम महसूल सेवक यांना देण्यात आले. यावेळी दुसरबीड महसूल मंडळ अधिकारी गजानन मनसुटे, ग्राम महसूल अधिकारी रविंद्र लांडगे, वसुदेव जायभाये, गोरख पवार, शिवानंद नागरे, वैशाली खंदारे यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे.


