mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

साठेगावचा विकास निधी गिळला : Sathegaons development fund swallowed 

शेअर करा :

Sathegaons development fund swallowed : सरकारी निधीवर डोळा ठेवून असलेल्या सरपंच व ग्रामसेवकाने  ग्रामविकासाचा निधी गिळंकृत केला, असा आरोप करीत ग्रामस्थ कारवाईसाठी एकवटले आहेत.

Sathegaons development fund swallowed


भ्रष्टाचाराविरुद्ध एकवटले ग्रामस्थ : घेतला आंदोलनाचा पवित्रा
सिंदखेड राजा : शासनाने साठेगावची विकासाची वाट खुली केली. थोडा थोडा का होईना निधी देऊन विकासाला चालना दिली. मात्र सरकारी निधीवर डोळा ठेवून असलेल्या सरपंच व ग्रामसेवकाने हा निधी गिळंकृत केला, असा आरोप करीत ग्रामस्थ कारवाईसाठी एकवटले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले असून कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
साठेगाववासियांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे सरपंच व ग्रामसेवक चांगलेच गोत्यात येण्याची शक्यता आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील साठेगाव येथील सरपंच व ग्रामसेवकाने शासकीय निधी प्रत्यक्ष कामे न करता हडप केला, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. हॅण्ड वॉश सेंटरसाठी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी ५० हजार रुपये  परस्पर काढण्यात आले. परंतु हॅण्ड वॉश सेंटर अद्याप उपलब्ध करण्यात आले नाही. व्यायाम शाळेच्या  साहित्यासाठी २० फेब्रुवारी २०२४ ला ४० हजार रुपये खर्च दाखविला. प्रत्यक्षात चार ते पाच हजार रुपयांचे साहित्य उपलब्ध आहे. पूर्ण निधी खर्च केला नाही. शेतमाल ने आण  करण्यासाठी शेत रस्ता मंजूर करण्यात आला. ८८ हजार ९०० रुपये शेतरस्त्याचा खर्च दाखविला. मात्र रस्त्याचा पत्ता नाही. रोड ब्रीज कलर्व्हर्डसवर ७० हजार ५८५ रुपये खर्च दाखविला. ३० युनीट दाखविले. तेदेखील करण्यात आले नाही. रस्त्यावर मुरूम टाकण्यासाठी ५० हजार रुपये ज्ञानेश्वर मुंढे यांना ३ ऑक्टोबर २०२२ रला दिल्याचे दाखविले. अद्याप त्या व्यक्तीने रस्त्यावर मुरुम टाकलाच नाही, असा आरोप आहे. तसेच  दुसरे मुरूम टाकण्याच्या कामावर २१ हजार २०० रुपये बिल ३ ऑक्टोबर २०२२ ला विजय डोईफोडे या व्यक्तीच्या नावाने काढण्यात आले. परंतु प्रत्यक्षात कोणत्याच रस्त्यावर गावामध्ये मुरुम टाकला नाही.
पाणीपुरवठा योजना  चार वर्षांपासून केवळ थंडबस्त्यात आहे. त्यामध्ये ठेकेदार, सरपंच, सचिव (ग्राम विकास अधिकारी) यांनी अपहार केल्याची शक्यता  असल्याचा संशय ही व्यक्त करण्यात आला आहे.

पाण्याची टाकी शाळेच्या जागेत

नवीन पाण्याची टाकी ही हायस्कूलच्या मैदानामध्ये अनधिकृतपणे बांधणे सुरू आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीवित्वास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी थातुरमातूर शोषखड्डे घेऊन दोन कचरा साठविण्याचे हौद बांधलेले आहे. मोठ्या निधीची अफरातफर केली आहे.



विविध कामांचा निधी लाटला

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी, सामान्य फंड, दलित वस्ती विकास योजना, पाणीपुरवठा कामे, पांदण रस्ते, रोजगार हमी योजनेमध्ये मोठा अपहार व भ्रष्टाचार  केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जि.प. शाळेमध्ये शौचालयाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. ग्रामसेवक व सरपंचांनी केलेल्या कामाची चौकशी करून  कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवनंदा सुनील झोटे, सर्जेराव नागरे, श्रीकृष्ण नागरे, वसंता घुगे, प्रशांत झोटे, अनंथा नागरे, गणेश नागरे, गजानन डोईफोडे, उद्धव नागरे, वसंता नागरे, रावसाहेब नागरे, शिवानंद नागरे, शिवाजी भालेगाव, राजेंद्र नागरे, विद्या झोटे, किरण झोटे, गणेश नागरे, सुहास युगे, स्वप्नील आंधळे, अक्षय वनवे, सुचित नागरे, शरद वनवे, विनोद नागरे, संजय नागरे, प्रकाश बोकडे यांनी केले आहे

Sathegaons development fund swallowed

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top