Schools instructed to keep 2500 students present at Presidents event : राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उद्बोधन कार्यक्रमास २ हजार ५०० विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवण्याचे फर्मान शिक्षण विभागाने सोडले आहे.

शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र
बुलढाणा : शेगाव येथे २५ फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उद्बोधन कार्यक्रमास २ हजार ५०० विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवण्याचे फर्मान शिक्षण विभागाने सोडले आहे.
केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या खासगी सहायक सचिवांच्या पत्राचा संदर्भ देत माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना विद्यार्थी उपस्थितीबाबत २० फेब्रुवारी २०२६ रोजी हे पत्र दिले.
केंद्रीय आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या वतीने २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय आरोग्य मेळावा शेगाव येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याहस्ते केले जाणार आहे. राष्ट्रपतींचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी जिल्ह्यातील अडीच हजार विद्यार्थी उपस्थित ठेवण्याबाबत गटशिक्षणाऱ्यांना आदेश देण्यात आले आहे.
सात ते अकरावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश
सकाळी ११ वाजता बुलढाणा जिल्ह्यातील इयत्ता सहावी सातवी, आठवी व नववी तसेच अकरावीचे विद्यार्थी सुरक्षिततेची जबाबदारी घेऊन हजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
तारखेचा घोळ; पत्राबाबत संभ्रम

जिल्ह्यातून अडीच हजार विद्यार्थी राष्ट्रपतींच्या उद्बोधनास हजर ठेवण्याचे सुचविले असलेतरी तारखांचा घोळ झाल्याने संभ्रम वाढला आहे. दोन तारखांमुळे गटशिक्षणाधिकारी चक्रावून गेले आहेत. विषयाचा संदर्भ देताना २५ तारीख लिहिण्यात आली आहे, तर पत्रातील मजकुराच्या ठिकाणी २७ फेब्रुवारी २०२६ असे उल्लेख करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना नेमके न्यायचे कधी? असा प्रश्न गटशिक्षणाधिकाऱ्यांना पडला आहे.

