Shiv Sena adopts a protest : खाऱ्या पाण्याचे म्हणून ओळखले जाणारे लोणार सरोवर आता वाढत्या पाणी पातळीमुळे धोक्यात आले आहे. सरोवराची अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या; अन्यथा समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करण्यासह धरणे आंदोलन व जलसमाधीसारखी आंदोलन केली जातील, असा इशारा शिवसेना (उबाठा) च्या वतीने देण्यात आला आहे.

बुलढाणा : खाऱ्या पाण्याचे म्हणून ओळखले जाणारे लोणार सरोवर आता वाढत्या पाणी पातळीमुळे धोक्यात आले आहे. सरोवराची अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या; अन्यथा समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करण्यासह धरणे आंदोलन व जलसमाधीसारखी आंदोलन केली जातील, असा इशारा शिवसेना (उबाठा) च्या वतीने देण्यात आला आहे.
शिवसेना (उबाठा)चे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छीरे यांच्यासह नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देऊन वेळीच उपाय न केल्यास आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे म्हटले आहे. लोणार सरोवर हे केवळ भारताचेच नव्हे तर जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील उल्कापाताने निर्माण झालेले भू-वैज्ञानिक आश्चर्य आहे. मात्र, सध्या सरोवराच्या पाणीपातळीत सुमारे २० ते २५ फूट वाढ झाल्याने या वारशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पूर्वी सरोवरातील पाण्याचा स्तर ११.५ इतका क्षारीय होता, तो आता ७.५ पर्यंत खाली आला आहे. तसेच टीडीएस ६००० वरून सुमारे ४०० पर्यंत घसरला आहे. यामुळे सरोवराची वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता धोक्यात येत आहे. पाण्यात मासे आढळून आले. अशी स्थिती कायम राहिल्यास सरोवराचे नैसर्गिक स्वरूप नष्ट होऊन ते सामान्य तलावात रूपांतरित होण्याची भीती आहे. याशिवाय अकराव्या शतकातील कमळजा माता मंदिर, सोळाव्या शतकातील गैबनशहा वली यांचा दर्गा तसेच इतर अनेक प्राचीन मंदिरे पूर्णत: पाण्याखाली गेली आहेत. गर्भगृहात पाणी शिरल्याने मूर्ती व मंदिर संरचनेचे नुकसान होत असून भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे पुरातत्व विभाग, वन्यजीव विभाग व महसूल विभाग यांच्यात समन्वय साधून मंदिर परिसरातील पाणी उपसण्यासाठी तातडीचे नियोजन करावे. सरोवराच्या सद्यस्थितीचा प्रभाव अहवाल व उपाययोजना (मास्टर प्लॅन) तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तहसीलदारांना निवेदन देताना डॉ. गोपाल बच्छीरे, गजानन जाधव, सूदन अंभोरे, विनायक मापारी, श्रीकांत मादनकर, इकबाल कुरेशी, ओवेस कुरेशी, अशपाक खान, फहीम खान, योगेश भुक्कन, ज्ञानेश्वर दुधमोगरे, सादिक शेख, विजय घोडके उपस्थित होते.

