mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

चिखलीत शिवसेनेचा महास्फोट : Shiv Sena’s Massive Breakthrough in Chikhli

शेअर करा :

Shiv Sena’s Massive Breakthrough in Chikhli : चिखलीत शिवसेनेचा महास्फोट

Shiv Sena's Massive Breakthrough in Chikhli

बुलढाणा :

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात आज एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना घडली. विद्यमान आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वावर आणि कार्यशैलीवर विश्वास ठेवत, भाजप, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी यांसह विविध पक्षांतील शेकडो पदाधिकारी, सरपंच आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी आज जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला. या ‘महाप्रवेश’ सोहळ्यामुळे चिखली मतदारसंघात शिवसेनेची ताकद आता गगनभरारी घेणारी ठरली असून, विरोधकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

बुलढाणा येथील ‘मातोश्री’ जनसंपर्क कार्यालयात हा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात आणि शक्तीप्रदर्शनाने पार पडला. नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या नियोजनातून आणि मार्गदर्शनाखाली हा ‘मास्टरस्ट्रोक’ लगावण्यात आला आहे.

 गावागावात भगवा फडकणार प्रमुख कार्यकर्त्यांची फळी शिवसेनेत

Shiv Sena's Massive Breakthrough in Chikhli

या सोहळ्यात मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या गावांतील प्रस्थापित नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने:

पांगरखेड: भाजप व्यापारी आघाडीचे तालुकाप्रमुख तथा सरपंच राजाराम पिंपळे यांच्यासह मोठा गट दाखल झाला.

केळवद: उबाठा गटाचे शाखाप्रमुख विनोद ठेंग यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भगवा हाती घेतला.

उदयनगर (उंद्री): सरपंच मनोज लाहुडकर, युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव रोहन कारंडे व संकल्प अर्बनचे अध्यक्ष अक्षय कारंडे यांचा प्रवेश झाला.

ढालसावंगी (धाड): तौफिक काजी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण काजी परिवाराने आणि समर्थकांनी प्रवेश केला.

सोयगाव व दहिद खुर्द: उपसरपंच रमेश तायडे आणि मधुकर दांडगे यांच्यासह मोठ्या संख्यने ग्रामस्थ सामील झाले.

इतर गावे: भोगावती, शिंदेहराळी, शेलुद, देवपूर, करणखेड, भानखेड, तेल्हारा, पेठ, बोरगाव काकडे, आंधई, गोदरी आणि डोंगरशेवली या गावांतील शेकडो तरुणांनी आणि ज्येष्ठांनी आमदार गायकवाड यांच्या नेतृत्वात काम करण्याची शपथ घेतली.

हा केवळ प्रवेश नाही, तर जनशक्तीचा हुंकार – आमदार संजुभाऊ गायकवाड

Shiv Sena's Massive Breakthrough in Chikhli

नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना आमदार संजुभाऊ गायकवाड भावूक झाले.

“चिखली मतदारसंघातील जनतेचा शिवसेनेवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. कोणत्याही दबावाशिवाय, केवळ विकासाच्या मुद्द्यावर आणि शिवसेनेच्या विचारधारेवर प्रेम करणारी ही माणसं आज आमच्यासोबत आली आहेत. हा प्रवेश म्हणजे आगामी काळात चिखलीच्या विकासाला मिळणारी नवीन गती आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षात मानाचे स्थान मिळेल आणि आपण सर्व मिळून शेतकरी, युवक व सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढू.”

Shiv Sena's Massive Breakthrough in Chikhli

 दिग्गज नेत्यांची मांदियाळी

या ऐतिहासिक क्षणी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर, तालुका समन्वयक नितीन राजपूत, नगरपालिका उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, शहरप्रमुख आशिष जाधव, युवासेना उपजिल्हाप्रमुख दीपक तुपकर, पंडितअण्णा जेठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. अनिल रिंढे यांनी केले. 

विरोधकांसाठी धोक्याची घंटा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखली मतदारसंघातील ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. एकाच वेळी भाजप, उबाठा आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना खिंडार पाडण्यात आमदार गायकवाड यांना यश आले आहे. यामुळे विरोधकांची रसद तुटली असून शिवसेनेचे संघटन तळागाळापर्यंत पोहोचले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top