Shivaji’s prowess revealed through Shahiri and Powads : शाहीर देवानंद माळी यांनी आपल्या शाहिरीतून शिवरायांचे शौर्य, पराक्रम, जनहिताची नीती, गनिमाचा बिमोड असा शिवकाळ जागृत केला.

शाहिरी, पोवाड्यांतून उलगडला शिवरायांचा पराक्रम
शिवजयंतीनिमित्त बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर
शाहीर देवानंद माळी यांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद : आमदार संजय गायकवाड यांचा शिवप्रेमींसोबत सहभाग
बुलढाणा : छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर देवानंद माळी यांच्या शाहिरी पोवाडा व स्फूर्तीगीतांच्या कार्यक्रमात शिवप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाहीर माळी यांनी आपल्या शाहिरीतून शिवरायांचे शौर्य, पराक्रम, जनहिताची नीती, गनिमाचा बिमोड असा शिवकाळ जागृत केला.
मराठी अस्मिता, शिवचरित्र आणि स्वराज्याच्या इतिहासाचा जागर करणाऱ्या या कार्यक्रमाने संपूर्ण परिसर शिवमय झाला. शाहीर देवानंद माळी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या ओजस्वी आवाजात पोवाडे आणि स्फूर्तीगीते सादर केली. शाहीर अभिजीत माळी यांनी गायलेल्या ‘हलगी वाजती’ या जोशपूर्ण गीतावर आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांनी शिवप्रेमींसमवेत उत्स्फूर्तपणे थिरकत मनमुराद आनंद लुटला. त्यांच्या या सहभागामुळे कार्यक्रमात अधिकच रंगत आली.
कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. शिवरायांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी जयंती उत्सव समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, शिवप्रेमी नागरिक, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


