Teacher beats up husband and wife : देऊळगाव साकर्शा येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकासह त्यांच्या शिक्षक पत्नीस काही गावकऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आला आहे.

शाळेतच घातला राडा
मुलीस लेझीममध्ये घेतल्यावरून काढला राग
बुलढाणा : मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकासह त्यांच्या शिक्षक पत्नीस काही गावकऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘आमच्या मुलींना सांस्कृतिक कार्यक्रमात लेझीममध्ये का घेतले’ या कारणावरून दोन वेळा मारहाण करण्यात आली.
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत प्रजासत्ताकदिनी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मुख्याध्यापक शेख अमिन शेख जुम्मा तसेच सहकारी शिक्षिका तथा त्यांच्या पत्नी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी शाळेत असताना काही लोकांनी शाळेत राडा घातला. शिक्षक दाम्पत्याला मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. काही नागरिकांनी हा वाद सोडविला. नंतर पुन्हा १ फेब्रुवारीलासुद्धा सायंकाळी काही जणांनी शाळेत जावून मुख्याध्यापक अमिन व त्यांच्या पत्नीस मारहाण केली. तसेच अर्वाच्च शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. शेख अमिन यांची मुलगी मध्यस्थी करू लागली असता तिलादेखील शिवीगाळ करण्यात आली.
दरम्यान, या प्रकारामुळे घाबरलेल्या मुख्याध्यापकांनी १ फेब्रुवारीला रात्री जानेफळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी चार जणांविरुद्ध बीएनएस कलम २९६, ११५ (२), ३५१ (२), २२१ नुसार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. अन्य आरोपी मोकाट असल्याचा आरोप शिक्षकाने केला आहे.
भयभीत दाम्पत्य आपत्कालीन रजेवर
आमच्या जीवाला धोका असल्याचे सांगत मुख्याध्यापक व त्यांच्या शिक्षक पत्नीने मेहकर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज देऊन आपत्कालीन रजा घेतली आहे. हा अर्ज मंजूर करण्यासाठी शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही गटशिक्षणाधिकाऱ्यांना स्वतंत्र अर्ज दिला.
आदर्श शिक्षक पुरस्कार
शेख अमिन शेख जुम्मा यांचे शैक्षणिक कार्य उत्कृष्ट असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने मागील वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अशा आदर्श शिक्षकाला मारहाण केल्याच्या घटनेने संताप व्यक्त होत आहे.

