mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

केदार नदीचा अतिक्रमणाचा विळखा तुटणार : The encroachment of Kedar river will be broken

शेअर करा :

The encroachment of Kedar river will be broken : बावनबीर येथील केदार नदीच्या काठावर वाढलेले अतिक्रमण पूरस्थितीला कारणीभूत ठरत असल्याने पावसाळ्यापूर्वी हटवावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या  नागपूर खंडपीठाने प्रशासनाला दिले. 

पूरस्थिती पाहता पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण हटवा : उच्च न्यायालयाचे निर्देश

संग्रामपूर : तालुक्यातील बावनबीर येथील केदार नदीच्या काठावर वाढलेले अतिक्रमण पूरस्थितीला कारणीभूत ठरत असल्याने पावसाळ्यापूर्वी हटवावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या  नागपूर खंडपीठाने प्रशासनाला दिले.

जनहित याचिकेची दखल घेत न्यायालयाने तातडीने अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. बावनबीर गावातून वाहणाऱ्या केदार नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन गावात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. २२ जून २०२३ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे केदार नदीला पूर आला होता. त्या वेळी नदीकाठावरील अतिक्रमणामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही आणि संपूर्ण बावनबीर गाव पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. या गंभीर परिस्थितीमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

याचिकाकर्त्यांनी या बाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी व निवेदने दिली होती. तसेच प्रकरणाची पाहणी करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी गावाला भेट देऊन अहवाल सादर केला होता. त्या अहवालातही नदीकाठावरील अतिक्रमणामुळे पूरस्थिती निर्माण होत असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र तक्रारी आणि अहवालांनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला.

सुनावणी करताना न्यायालयाने जिल्हाधिकारी व संग्रामपूर तहसीलदारांना निर्देश दिले. याचिकाकर्त्यांनी ८ व ५ डिसेंबर २०२४ रोजी दिलेल्या निवेदनांचा विचार करून आठ आठवड्यांच्या आत योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच संबंधित पक्षांना सुनावणीची संधी देऊन कायद्यानुसार कारवाई करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top