The impact of time on women agricultural workers : ॲपेमधून शेतात जाणाऱ्या किनगाव जट्टू येथील मजूर महिलांवर १ फेब्रुवारीला सकाळी साडेआठच्या सुमारास काळाने झडप घातली. स्विफ्ट डिझायरने ॲपेला जोरदार धडक दिल्याने ॲपेचा चुराडा झाला. यात एक महिला ठार झाली. तर काही महिला जखमी झाल्या.

ॲपेला स्विफ्टची धडक; एक ठार, तिघी गंभीर
मयूर गोलेच्छा
लोणार : ॲपेमधून शेतात जाणाऱ्या किनगाव जट्टू येथील मजूर महिलांवर १ फेब्रुवारीला सकाळी साडेआठच्या सुमारास काळाने झडप घातली. स्विफ्ट डिझायरने ॲपेला जोरदार धडक दिल्याने ॲपेचा चुराडा झाला. यात एक महिला ठार झाली. तर काही महिला जखमी झाल्या. यातील तीन महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. सरस्वती–मातमळ गावाला जोडणाऱ्या जोड रस्त्यावर ही भीषण दुर्घटना घडली.
तालुक्यातील सरस्वती येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कामासाठी जात असताना १ फेब्रुवारी २०२६ सकाळी ८.३० वाजता दरम्यान सरस्वती–मातमळ गावाला जोडणाऱ्या जोड रस्त्यावर हिवराखंडकडे जाणाऱ्या MH 43 AF 5821 क्रमांकाच्या मारुती स्विफ्ट कारने MH 20 R 2211 क्रमांकाच्या ॲपेला जोरदार धडक दिली. या अपघातात ॲपेमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित महिला गंभीर जखमी झाल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव जट्टू येथील मजूर महिला नेहमीप्रमाणे शेतमजुरीसाठी पहाटेच घराबाहेर पडल्या होत्या. वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
स्विफ्ट कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार ॲपेवर जोरात धडकली.
अपघातानंतर काही क्षणातच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. लोणार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी गाठले. जखमी महिलांना रुग्णवाहिकेद्वारे लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.


लोणार पोलिसांनी स्विफ्ट कार चालकाविरोधात अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग, रस्त्याची स्थिती आणि ॲपेतील प्रवाशांची संख्या याबाबत सखोल चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, ग्रामीण भागात शेतमजुरांची वाहतूक करताना सुरक्षेच्या उपाययोजना दुर्लक्षित केल्या जात असल्याने असे अपघात घडत असल्याची चर्चा होत आहे. मजूर वाहतुकीबाबत कठोर नियमांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

अपघातातील जखमीपैकी ३ ते ४ महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या महिलांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

