१२०० खेळाडू उतरणार मैदानात : जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी केली पूर्ण
The sports com inplex will be bustling with sectional competitions from Thursday : बुलढाण्यासह अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम अशा पश्चिम विदर्भातील जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा १२ ते १४ फेब्रुवारीपर्यंत पार पडणार आहेत. पाचही जिल्ह्यांमधून १२०० खेळाडू मैदानात उतरणार आहेत.

बुलढाणा : क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाची जय्यत तयारी जिल्हा परिषद प्रशासनाने पूर्ण केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात १० सांघिक खेळ, ६० वैयक्तिक खेळ व ९ सांस्कृतिक कार्यक्रम राहणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून १६० पुरुष, ११० महिला, अमरावती १२० पुरुष, ८५ महिला, यवतमाळ १३५ पुरुष, ९२ महिला, अकोला १०७ पुरुष, ७८ महिला, वाशीम जिल्ह्यामधून ११२ पुरुष, ८३ महिला, आयुक्त कार्यालयातून ६० पुरुष, ३५ महिला असे एकूण १ हजार १७७ खेळाडू सहभागी होणार आहेत. विभागातून ६९४ पुरुष व ४८३ महिला खेळाडूंचा समावेश यामध्ये आहे.
क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ८२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचीही माहिती गुलाबराव खरात यांनी यावेळी दिली. नाश्ता व जेवणाची व्यवस्था क्रीडा संकुल येथेच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
श्वेता सिंघल यांच्या हस्ते उद्घाटन
उद्या १२ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील उपस्थित राहतील. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अमरावती सीईओ संगीता महापात्र, यवतमाळ सीईओ मंदार पत्की, वाशीम सीईओ अर्पित चौहान, अकोला सीईओ अनिता मेश्राम, अप्पर आयुक्त संतोष कवडे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांची उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता सीईओ गुलाबराव खरात व अप्पर आयुक्त राजीव फडके यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. १४ फेब्रुवारीला सायंकाळी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहावे, आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) आशिष पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी केले आहे.

