The woman climbed a tree as soon as she saw a leopard :

उसाच्या मळ्यात थरार
खामगाव : तालुक्यातील घाटपुरी शिवारात शुक्रवार, २७ फेब्रुवारीला सकाळी बिबट्याचे दर्शन होताच शेतकरी व मजुरांमध्ये घबराट पसरली. बिबट्या समोर येताच घाबरलेल्या दोन मजूर महिला जीव वाचविण्यासाठी झाडावर चढल्या. बराच काळ त्या झाडावरच थांबल्या. पोलीस व वनविभागाच्या मदतीने त्यांना सुखरूप खाली उतरविण्यात आले.
या थरारक घटनेने परिसर हादरला आहे. गोकुळ चोपडे यांच्या उसाच्या मळ्यात हा बिबट मुक्तसंचार करीत असल्याने मोठी धास्ती पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तर तहसीलदार सुनील पाटील, नायब तहसीलदार निखिल पाटील, तहसीलदार, सोनाली भाजीभाकरे यासह इतर कर्मचारीही दाखल झाले. शेतकऱ्यांसह मजुरांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वनविभागाचे रेस्क्यू पथक दाखल
वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल पवार यांच्यासह कर्मचारी आणि रेस्क्यू पथकही उसाच्या मळ्यात दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावण्याची तयारी करण्यात आली आहे.




