Two groups of former and current Speakers clashed : गुंज येथे मिरवणुकीदरम्यान डीजे वाजविण्याच्या कारणावरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजी व माजी सभापतींच्या दोन गटांत हाणामारी झाली.

‘डीजे’वरून उफाळला वाद : गुंजमध्ये मिरवणुकीला गालबोट : चार जण जखमी
सिंदखेड राजा : तालुक्यातील गुंज येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान डीजे वाजविण्याच्या कारणावरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजी व माजी सभापतींच्या दोन गटांत हाणामारी झाली. हाणामारी चार जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटांतील १९ जणांविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
गुंज येथे सायंकाळी मिरवणुकीस प्रारंभ झाला होता. वाजत गाजत ही निवडणूक पुढे सरकत होती. रात्री साडेआठ वाजता मिरवणूक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर यांच्या घरासमोर आली. घरात अँजिओप्लास्टी झालेला रुग्ण असल्याने समोर नेऊन डीजे वाजवा, अशी विनंती तुपकर यांनी केली. त्याचवेळी मिरवणुकीत सहभागी युवकांनी त्यांच्याशी वाद घातला. काही जणांनी जुना राजकीय वाद उकरून काढत अनिल तुपकर यांच्यासह आई, वडील व भावास मारहाण केली. यात मुरहरी तुपकर यांना गंभीर दुखापत झाली आहे. अनिल तुपकर यांच्या तक्रारीवरून अमोल सुरेश तुपकर, माजी सभापती सुरेश माधवराव तुपकर, ऋतिक गजानन तुपकर, श्याम सुरेश तुपकर, गजानन केशव तुपकर, कार्तिक अनंता तुपकर, समर्थ गणेश तुपकर, चेतन गणेश तुपकर, अनंता केशव तुपकर, कडूबा मनोहर तुपकर, पवन परसराम तायडे, अक्षय पप्पू तुपकर, प्रथमेश रमेश तुपकर, रमेश माधवराव तुपकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११८ (२), १९१ (२), १९१ (३), १२५ (इ), ३३३, ३५१ (२), ३५२ नुसार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
दुसऱ्या गटातील माजी सभापती सुरेश तुपकर यांनीही पोलिसांत फिर्याद नोंदविली. मिरवणूक सुरू असताना ऋतिक गजानन तुपकर, समर्थ तुपकर व अक्षय तुपकर यांना अडवून अनिल तुपकर व मुरहरी तुपकर काठ्यांनी मारहाण करीत होते. आरोपीच्या हातातील काटेरी काठी पकडल्याने माजी सभापती सुरेश तुपकर यांनाही दुखापत झाली. माजी सभापती तुपकरांच्या तक्रारीवरून अनिल मुरहरी तुपकर, मुरहरी बाजीराव तुपकर, अशोक मुरहरी तुपकर, विठ्ठल जनार्दन तुपकर, योगेश रामचंद्र तुपकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ ( १), १९१(२), १९१(३) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.

