Zilla Parishad employees will take the field : जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ४ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत बुलढाणा येथे पार पडणार आहेत.

क्रीडासोबत सांस्कृतिक स्पर्धा रंगणार
बुलढाणा : दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या तयारीला लागले आहेत. २ फेब्रुवारीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या क्रीडा स्पर्धा संपताच ४ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडणार आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या पुढाकाराने स्पर्धा पार पडणार आहेत. उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील हे करणार आहेत. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, प्रमोद यंडोले तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या प्रमुखांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील तालुकास्तरावरील विजेते संघ सहभागी होणार आहेत.
समित्यांवर सोपविली कामे
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदअंतर्गत विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कामांची जबाबदारी ठरवून देण्यात आली आहे. क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार व प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले आहे.

