Tragic death of a Warkari who was on his way to celebrate the Proclamation Day festival : एका दिंडी सोहळ्यातील वारकऱ्याचा ट्रॅक्टरमधून पडल्यानंतर वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. ७ फेब्रुवारीला शेगाव-खामगाव मार्गावर लासुराजवळ ही दुर्दैवी घटना घडली.

प्रगटदिन उत्सवाला निघालेल्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
शेगाव : संत गजानन महाराजांच्या प्रगटदिन उत्सवानिमित्त पायदळ दिंड्या शेगावकडे मोठ्या संख्येने येत आहेत. एका दिंडी सोहळ्यातील वारकऱ्याचा ट्रॅक्टरमधून पडल्यानंतर वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. ७ फेब्रुवारीला शेगाव-खामगाव मार्गावर लासुराजवळ ही दुर्दैवी घटना घडली.
गजानन महाराजांचे भक्त जनार्दन दगडू गाडेकर (वय ६५) यांच्यावर काळाने घाला घातला. या दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. जनार्दन गाडेकर हे बुलढाणा तालुक्यातील सावळा येथील रहिवासी होते. शेगाव येथे जातना प्रवासादरम्यान ते ट्रॅक्टरमध्ये बसले. शेगावनजीक असतानाच लासूरा शिवारात तोल जाऊन ते वाहनातून रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी मागून आलेल्या वाहनाने त्यांना चिरडले. यात त्यांचा मृत्यू झाला. सावळा येथे त्यांच्यावर पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सावळा गावावर शोककळा
या दुर्घटनेत जनार्दन गाडेकर यांचा मृत्यू झाल्याने गाडेकर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून, सावळा गावही शोकसागरात बुडाले आहे. शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर यांचे ते वडील होते.

