One village, one fight! The Kalona villagers’ hunger strike has shaken the administration:काळोना गावातील ग्रामस्थांचे उपोषण यशस्वी; प्रशासनाने दिली तात्काळ मागण्या पूर्ण करण्याची हमी – पहिल्याच दिवशी उपोषण मागे 
बुलढाणा : १० फेब्रुवारी २०२६: महाराष्ट्राच्या विकासाच्या दौडीत शहर आणि महामार्ग स्मार्ट होत असताना ग्रामीण भाग अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील काळोना हे छोटेसे गाव त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. गावाचे नाव आजही महसूल नकाशावर दिसत नाही, रस्ते दयनीय अवस्थेत आहेत, स्मशानभूमीची समस्या गंभीर आहे आणि खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यापासून गाव वंचित आहे.
या सर्व समस्या सोडवण्यासाठी युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर, विशाल थुट्टे आणि इतर सहकारींसह गावातील महिला-पुरुष ग्रामस्थांनी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी बेमुदत अमरण उपोषण सुरू केले. उपोषण स्थळी हजारो ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी चार प्रमुख मागण्या मांडल्या:
काळोना गाव महसूल पट्ट्यात (revenue records मध्ये) समाविष्ट करणे,गावाला येणाऱ्या रोडची तात्काळ दुरुस्ती,स्मशानभूमीची समस्या मार्गी लावणे.खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ गावाला मिळवून देणे.
उपोषणाची दखल घेत प्रशासनाने त्वरित प्रतिसाद दिला. चिखली तहसीलदार गायकवाड साहेब, अंडेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शक्करगे साहेब, पाटबंधारे विभागाचे पांडे साहेब, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे चेके साहेब यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित राहिले. सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे यांचे सासरे यांनी रोड आणि स्मशानभूमीच्या कामासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दूरध्वनीवरून सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
प्रशासनाने सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासाठी वेळ मागितला आणि सकारात्मक हमी दिल्याने उपोषणकर्त्यांनी पहिल्याच दिवशी उपोषण मागे घेतले. लिंबू सरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. या यशस्वी आंदोलनात पंजाबराव जावळे, विष्णू पाटील घुबे, प्रा. उद्धव घुबे, सतीश पाटील भुतेकर, उषाताई थुट्टे पाटील, उद्धव पाटील थुट्टे, भिकन पाटील भुतेकर, ऋषी भोपळे, प्रशांत जेवाळ यांच्यासह गणेश उसर, समाधान उसर, मधुकर उसर, सावन सिंग उसर, सिद्धेश्वर उसर, विठ्ठल उसर, विलास उसर, तुकाराम उसर, ज्ञानेश्वर उसर, सुखदेव गाडेकर, शिवाजी गाडेकर, रंगनाथ शिंदे, भास्कर शिंदे, शिवाजी उसर, रमेश उसर, नारायण सर, विजय उसर यासह असंख्य महिला-पुरुष सहभागी झाले.
हे उपोषण ग्रामीण महाराष्ट्रातील मूलभूत सुविधांच्या लढ्याचे प्रतीक ठरले आहे. आता प्रशासनाने दिलेल्या हमीवर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
( विशेष म्हणजे उपोषण च्या निमित्ताने ठाणेदार गावात आले होते ज्या बोलेरो गाडी ते आले त्या बोलोरे गाडीचे चेंबर सदर रस्त्याने फुटून गाडी रस्त्यावरच बंद पडली एक दिवस आलेल्या अधिकाऱ्यांची ही अवस्था होत असेल तर गावकऱ्यांना किती त्रास सोसावा लागत असेल हे विशेष )

