Sant Gadge Baba Amravati University’s Social Work Award announced to Divya Foundation : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा नागोराव जयराम मेटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार–२०२५’ हा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वरवंड येथील दिव्या फाउंडेशन या संस्थेला जाहीर झाला आहे.

बुलढाणा : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा ‘कै. नागोराव जयराम मेटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार–२०२५’ हा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वरवंड येथील दिव्या फाउंडेशन या संस्थेला जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार संत गाडगे बाबांच्या दशसूत्री तत्त्वांनुसार समाजोपयोगी कार्य करणाऱ्यांना देण्यात येतो. सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि जनहिताचे उपक्रम राबवणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो. मानसिक आजारग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गेली बारा वर्षे अविरतपणे कार्य करणाऱ्या अशोक काकडे यांच्या कार्याचा हा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दिव्य सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत ८०० हून अधिक मनोरुग्णांचे यशस्वी पुनर्वसन करण्यात आले आहे. तर १०० मनोयात्री प्रकल्पात सध्या उपचार घेत आहे. उपचार, समुपदेशन, पुनर्वसन या सर्व पातळ्यांवर त्यांनी राबवलेले कार्य राज्यभर उल्लेखनीय ठरले आहे. उपेक्षित घटकांना माणुसकीची वागणूक, सन्मानाचे जीवन व आत्मनिर्भरतेकडे नेणारी दिशा देण्याचे काम अशोक काकडे सातत्याने करत आहेत. अशोक काकडे यांना मिळालेल्या या गौरवामुळे दिव्य सेवा प्रकल्पाच्या कार्याला नवी ऊर्जा मिळणार असून मानसिक आरोग्य क्षेत्रातील सेवेला अधिक व्यापक मान्यता मिळणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांच्या स्वाक्षरीने अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून लवकरच हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.

