Sculpture of Jijau along with Bal Shivaba will be made in Zilla Parishad : महाराष्ट्राची अस्मिता, अभिमान राजमाता, राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्यासह बालशिवबांचे प्रेरणादायी शिल्प १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या पर्वावर जिल्हा परिषदेत साकारले जाणार आहे.

शिवजयंतीला होणार विराजमान
सीईओ गुलाबराव खरात यांचा पुढाकार
बुलढाणा : महाराष्ट्राची अस्मिता, अभिमान राजमाता, राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्यासह बालशिवबांचे प्रेरणादायी शिल्प १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या पर्वावर जिल्हा परिषदेत साकारले जाणार आहे. पुणे येथील मूर्तिकाराकडे शिल्पावर अंतिम हात फिरविला जात आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी हे शिल्प साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सेस फंडातून निधीची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद इमारतीत मुख्य प्रवेशद्वारासमोरच माँ साहेब जिजाऊ यांची प्रतिमा आधीपासूनच होती. त्यावर आकर्षक छत्र तयार करण्यात आले आहे. त्याच ठिकाणी बालशिवबांसह राजमाता जिजाऊ भव्य शिल्प असावे, ही मनोभावना गुलाबराव खरात यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार तत्काळ शिल्पाकरिता निधी मंजूर करण्यात आला.
राजमाता जिजाऊ यांचे सिंदखेड राजा व बुलढाणा जिल्ह्याच्या मातीशी घट्ट नाते आहे. त्या जिल्ह्याचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या नावाने बुलढाणा जिल्ह्याची ओळख मातृतीर्थ म्हणून झाली आहे. त्यांच्यापासून सदोदित प्रेरणा मिळत राहो, यासाठी हे शिल्प तयार करण्यात येत आहे. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीला शिल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे.

