Blocking the path of beneficiaries for housing subsidy : घरकुलांचे अनुदान मिळाले नसल्याने रायपूर येथील लाभार्थ्यांनी बस थांब्यावर आज सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे बुलढाणा, चिखली, सैलानी, दुधा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

रायपूर येथे वाहतूक ठप्प
बुलढाणा : घरकुलांचे अनुदान मिळाले नसल्याने रायपूर येथील लाभार्थ्यांनी बस थांब्यावर आज सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे बुलढाणा, चिखली, सैलानी, दुधा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, बुलढाणा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झाली आहेत. परंतु अनुदानाचा एकच हप्ता मिळाला आहे. आणखी अनुदान मिळाले नसल्यामुळे घरकुलांचे काम रखडले आहे. घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी आधीचे घर मोडून टाकण्यात आले आहे. आता तात्पुरता निवारा म्हणून लाभार्थी कुटुंबांना भाड्याने घर घेऊन राहावे लागत आहे. आधीच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लाभार्थ्यांकडे पैशांची अडचण आहे. घरकुलांचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी द्यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता बस थांब्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
ग्रामपंचायत सदस्य नीलेश राजपूत, शमीम सौदागर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाची माहिती समजल्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी सत्कार लेखी आश्वासन दिले.
काय म्हटले बीडीओंच्या पत्रात
६४७ घरकुले मंजूर झाली आहेत.
सहायक लेखा अधीक्षकांची बदली झाली आहे. नवीन अधीक्षकांची डीएससी झाल्यानंतर १० फेब्रुवारीला हप्ते दिले आहेत. ते लाभार्थ्याच्या खात्यात ऑनलाइन प्रणालीद्वारे पडतील व उर्वरित लाभार्थ्यांची हप्ते लवकरात लवकर देण्यात येतील, असे लेखी नमूद करण्यात आले आहे. ६३० लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिलेला आहे. तसेच दुसरा हप्ता १४५ लाभार्थ्यांना दिला आहे. तिसरा हप्ता ४० लाभार्थ्यांना दिला आहे. १७ लाभार्थ्यांचा हप्ता बाकी आहे. त्याचे कारण आधार पेंडिंग पीएफएमएस आहे. ते क्लिअर झाल्यानंतर उर्वरित हप्ते दिले जातील.

