Excitement over discovery of skull and bones : कवटी आणि हाडांचा एक मानवी सांगाडा मस धरण परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मस धरणाजवळ सापडला मानवी सांगाडा
खामगाव : कवटी आणि हाडांचा एक मानवी सांगाडा मस धरण परिसरात आढळून आल्याने खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव तालुक्यातील मस धरणाच्या काठावर १४ फेब्रुवारीच्या सकाळी हा मानवी सांगाडा आढळून आला. रामनगरचे ग्रामपंचायत कर्मचारी महेंद्रसिंग मुख्त्यारसिंग राठोड (वय ५२) हे १४ फेब्रुवारीला सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास पाणीपुरवठा योजनेचा वीजपंप सुरू करण्यासाठी मस धरण परिसरात गेले होते. धरणकाठावरील चिखलात त्यांना मानवी कवटी व हाडे विखुरलेली आढळली. मृत व्यक्तीच्या अंगावर असलेले काही फाटके कपडेही आढळले. कवटी आणि हाडे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. मृतदेह कुजून हाडे वेगळी झाली. त्यामुळे ओळख पटविणे अवघड आहे. फॉरेन्सिक लॅबमध्ये कवटी, हाडांची तपासणी केल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. हा सांगाडा महिलेचा की पुरुषाचा हेदेखील कळणे कठिण आहे. त्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कसा झाला, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सांगाड्याच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींची यादी तपासण्यास सुरुवात केली आहे.


