Seized sand free for housing beneficiaries : येवती येथील गट क्रमांक ३४२ मधील सरकारी ई-क्लास जमिनीवर विनापरवाना साठवून ठेवलेला सुमारे ४८ ब्रास रेतीचा साठा जप्त करून तो थेट घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरित करण्यात आला.

तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांचा पुढाकार
रिसोड : तालुक्यात अवैध गौणखनिज साठ्यावर कठोर कारवाई करीत महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा प्रभावी पाऊल उचलले आहे. येवती येथील गट क्रमांक ३४२ मधील सरकारी ई-क्लास जमिनीवर विनापरवाना साठवून ठेवलेला सुमारे ४८ ब्रास रेतीचा साठा जप्त करून तो थेट घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरित करण्यात आला.
ही संपूर्ण कारवाई तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गजानन जवादे, मंडळ अधिकारी जी. एल. गरकळ, ग्राम महसूल अधिकारी डी.डी. सावळे, दीपक गोटे, विनोद दुबे, एम.एम. कव्हर आणि जी.आर. खूपसे यांनी ही कारवाई केली. अवैध साठ्यावर कठोर कारवाई करतानाच जप्त केलेला माल गरजू आणि पात्र लाभार्थ्यांच्या उपयोगासाठी देण्याचा सकारात्मक निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे प्रशासनाची कारवाई केवळ दंडात्मक न राहता सामाजिकनदृष्ट्याही उपयुक्त ठरली आहे.
गावातील द्वारकाबाई मारोती शिंदे, पार्वती नाथा घनवे, कावेरी भीमराव शिंदे, कलावती जयराम दवणे, पार्वती सदाशिव ढोरे, लीलावती आत्माराम दळवे, रुखमाबाई महादेव टाकसाळ, बंडू केशव शिंदे, गजानन संपत शिंदे, शारदाबाई मारुती शिंदे, कैलास सखाराम बोकन व दत्तराव सखाराम बोकन १२ घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी ४ ब्रासप्रमाणे एकूण ४८ ब्रास रेतीचे मोफत वाटप करण्यात आले.

विशेष म्हणजे, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या कार्यकाळात आतापर्यंत रिसोड तालुक्यात जप्त करण्यात आलेल्या १८४ ब्रास रेतीचा साठा ११२ घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आला आहे. अवैध गौणखनिज साठ्याविरुद्ध कठोर भूमिका आणि गरजूंना थेट मदत या दुहेरी उद्दिष्टांमुळे महसूल प्रशासनाची ही कारवाई कौतुकास्पद ठरत आहे.

