Forced child marriage; girl pregnant : अल्पवयीन मुलीशी तरुणाने जबरदस्तीने बालविवाह केला. नंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने मुलगी गर्भवती राहिली. रुग्णालयात तपासणीला गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

खामगाव : अल्पवयीन मुलीशी तरुणाने जबरदस्तीने बालविवाह केला. नंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने मुलगी गर्भवती राहिली. रुग्णालयात तपासणीला गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खामगाव तालुक्यात ही घटना घडली.
आरोपी विजय रामदास तायडे (वय २९) असे आरोपीचे नाव आहे. तो खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे येथील रहिवासी आहे. १७ वर्षीय पीडितेशी आरोपीने तिच्या आई- वडिलांची संमती न घेता १९ जुलै २०२५ रोजी एका धार्मिक स्थळी नेऊन लग्न केले. आरोपीने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. अकोला येथे तपासणी केली असता ही घटना समोर आली.
बाधित निघाल्याने गर्भपाताचा सल्ला
अकोला येथील शासकीय रुग्णालयात तपासणीदरम्यान पीडितेचा गर्भ खराब असल्याचे निदर्शनास आले. तिला गर्भपाताचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. मात्र, पीसीपीएनडीटी कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने पीडित मुलीस परवानगीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
बलात्कार, पॉक्सोचे गुन्हे दाखल
या प्रकरणी १४ फेब्रुवारी रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४, पोक्सो कायदा कलम ४ (१) तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रीना सदार करत आहेत.

