Farmer beaten up by installment gang : परिसरात हप्ता गॅंग वाढीस लागली असून १५ फेब्रुवारीला रात्री आणखी एकाला हप्तेखोरांनी मारहाण केल्याची घटना घडली.

हॉटेल चालविण्यासाठी मागितला हप्ता
धाड : परिसरात हप्ता गॅंग वाढीस लागली असून १५ फेब्रुवारीला रात्री आणखी एकाला हप्तेखोरांनी मारहाण केल्याची घटना घडली. मौंढाळा येथील एका शेतकऱ्याने साइड बिझिनेस म्हणून करडी फाट्यावर हॉटेल सुरू करण्यासाठी जागेचा शोध घेतला. याची माहिती समजताच हप्ता गॅंगमधील चार जणांनी शेतकऱ्यास त्याच्या घरी जाऊन मारहाण केली. हे प्रकरण धाड पोलिसांत पोहोचल्यानंतर चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
धाडपासून जवळच असलेल्या मौंढाळा येथील भागवत पांडुरंग जाधव (वय ४८) हे करडी फाटा येथे हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी भाड्याने दुकान शोधण्याकरिता १५ फेब्रुवारी रोजी गेले होते. संध्याकाळी घरी पोहचले. रात्री आठ वाजता प्रभाकर दामोदर वैद्य, विष्णू पांडुरंग उबाळे, भागवत विष्णू उबाळे व दीपक चिंचोले यांनी जाधव यांना घराबाहेर बोलावून धाड येथे किंवा करडी फाट्यावर हॉटेल सुरू करायचे असेल तर आम्हाला दर महिन्याला हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली. नकार देताच चारही आरोपींनी अर्वाच्च शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. हल्लकल्लोळ ऐकायला येताच रामेश्वर जाधव, सुनील जाधव या दोघांनी चौघांच्या तावडीतून त्यांना सोडविले.
धाड पोलिसांनी आरोपी प्रभाकर वैद्य, विष्णू उबाळे, भागवत उबाळे व दीपक चिंचोले या यांच्याविरुद्धच भारतीय न्याय संहिता कलम २९६, ३०८ (३), ११५, ३५२, ३५१ (१), ३६५ नुसार गुन्हे दाखल केले. घटनेचा अधिक तपास युवराज मुळे हे करीत आहेत.
गुंड प्रवृत्तींकडून जिवाला धोका
भागवत जाधव यांनी चारही आरोपी गुंड प्रवृत्तीचे असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या आरोपींपासून जिवाला धोका असल्याचेसुद्धा त्यांनी म्हटले आहे.

