The rampage of the installment gang continues : हप्ता गँगने धाड व परिसरात आपली दादागिरी वाढवत बाहेरगावाहून येऊन व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना मारहाण करून धुडगूस घातला. १५ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता एका हॉटेलमध्ये धिंगाना घातल्यानंतर याच आरोपींच्या टोळीतील तिघांनी तासाभरानंतर दुसऱ्या हॉटेलमध्येही दहशत पसरविली.

हप्ता वसुलीच्या पुन्हा दोन घटना : दोन हॉटेलांमध्ये धुडगूस : मारहाण
धाड : हप्ता गँगने धाड व परिसरात आपली दादागिरी वाढवत बाहेरगावाहून येऊन व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना मारहाण करून धुडगूस घातला. १५ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता एका हॉटेलमध्ये धिंगाना घातल्यानंतर याच आरोपींच्या टोळीतील तिघांनी तासाभरानंतर दुसऱ्या हॉटेलमध्येही दहशत पसरविली. तासाभराच्या फरकाने घडलेल्या दोन घटनांनी धाड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दीपक चिंचोले, सौरव कुटे व प्रभाकर वैद्य अशी आरोपींची नावे असून तिघेही धाड येथील रहिवासी आहेत.
सुशील बावस्कर यांचे करडी फाट्यावर हॉटेल राजयोग या नावाने हॉटेल आहे. त्यांचे पाहुणे मित्रांसोबत जेवण करण्यासाठी तेथे गेले होते. त्यांना आरोपींनी काही एक कारण नसताना कोणत्या गावचे आहे, असे विचारले. तक्रारकर्ते बावस्कर यांनी पाहुणे असल्याचे सांगितले. त्याचवेळी आरोपींनी धाड गावामध्ये जेवायला यायचे नाही, असा दम भरला. तसेच चष्म्याचे दुकान आहे, तुला यापुढे धाडमध्ये दुकान चालवायचे असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल, अशा धमक्या दिल्या. हॉटेल चालविण्यासाठी आम्हाला हप्ता द्यावा लागेल म्हणून धमक्या दिल्या.
आरोपींनी दहशत माजविल्यानंतर एका तासाने हेच आरोपी रात्री दहा वाजता मधुकर रामचंद्र कायंदे (वय ६०, रा. ढालसावंगी) यांच्या हॉटेलमध्ये गेले. खानावळ बंद करीत असताना आरोपींनी धुमाकूळ घातला. अश्लील शिवीगाळ केली. मुडदा पाडू, अशा धमक्या दिल्या. हॉटेल चालवायची असेल तर हप्ता द्यावा लागेल, असे बजावले.
तीन गुन्ह्यांमध्ये आरोपींचा सहभाग
दीपक चिंचोले व प्रभाकर वैद्य या आरोपींनी आतापर्यंत हप्ता मागत धुडगूस घातल्याच्या तीन घटना घडल्या. तसेच यापूर्वी हप्ता गँग दुसऱ्या टोळीतील चार जणांनी पवन सोनुने या मेडिकल संचालकास हप्त्यासाठी मारहाण केली होती.

