mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

जिजाऊंचे शिल्प देत राहील प्रेरणा : Jijaus sculptures will continue to inspire

शेअर करा :

Jijaus sculptures will continue to inspire : जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारी स्थापिलेले राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांचे शिल्प हे विकसित भारताच्या संकल्प पूर्तीसाठी सातत्याने प्रेरणादायी राहील. या प्रेरणेच्या माध्यमातून ग्राम स्वराज्यासोबतच सुराज्याचा विश्वास सुद्धा दृढ होईल, असा विश्वास केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला.

Jijaus sculptures will continue to inspire
Jijaus sculptures will continue to inspire


जिल्हा परिषदेत बालशिवबांसह जिजाऊंच्या शिल्पाचे अनावरण
शिल्प सुराज्यासाठी सदैव प्रेरणादायी : ना. प्रतापराव जाधव


बुलढाणा : त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील शिखर संस्था असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारी स्थापिलेले राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांचे शिल्प हे विकसित भारताच्या संकल्प पूर्तीसाठी सातत्याने प्रेरणादायी राहील. या प्रेरणेच्या माध्यमातून ग्राम स्वराज्यासोबतच सुराज्याचा विश्वास सुद्धा दृढ होईल, असा विश्वास केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारात आज छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती सोहळ्याच्या औचित्यावर राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात व त्यांच्या सुविद्य पत्नी रिपिका खरात, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती दिलीप जाधव, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना महिला आघाडी प्रमुख अनुजा सावळे, पत्रकार रणजित राजपूत, अहिल्यानगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे, आशुतोष गुप्ता, डॉ. नरवाडे, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, शिवशंकर भारसाकळे, प्रमोद एंडोले, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ, योजना विभागाचा शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, कार्यकारी अभियंता सुशील गुडदे, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक सतीश देशमुख, कृषी विकास अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत, जिल्हा जलसंधारण अधिकारी स्नेहल माने व इतर खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. जाधव म्हणाले की, सामाजिक जीवनामध्ये महापुरुषांचे जयंती उत्सव, राष्ट्रीय सण समारंभ साजरे करणे हे संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रमाता जिजाऊंच्या धैर्याने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले होते. स्वराज्यापासूनचा सुराज्यापर्यंतचा प्रवास हा आजही सुरू आहे. या प्रवासात समस्त महापुरुषांच्या योगदानाची प्रेरणा आम्हाला सदैव आवश्यक आहे. त्या दृष्टीने ग्रामीण क्षेत्रात कार्य करणारी जिल्हा परिषद ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारावर राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांचे शिल्प अनावरण हा निश्चितच उल्लेखनीय व अविस्मरणीय समारंभ आहे. या माध्यमातून महापुरुषांची प्रेरणा आम्हाला विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढील अनेक पिढ्यांपर्यंत प्रेरणा देणारी राहील, असा विश्वास ना. जाधव यांनी व्यक्त केला.
आपल्या प्रासंगिक मार्गदर्शनात आ. संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेने शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी काढलेल्या रॅलीचा विशेष उल्लेख करून शिव जयंती उत्सवात शहरातील वातावरणात जल्लोषाची भर घातल्याचे ते म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारी राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांचे शिल्प कायमस्वरूपी स्थापित करण्याबाबतची संकल्पना स्पष्ट केली.
प्रारंभी ना. प्रतापराव जाधव, आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते संगीतमय वातावरणात व आतिशबाजी मध्ये शिल्पाचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा शाहीर विक्रांत सिंग राजपूत यांच्या शिवचरित्र कथन व शाहिरीच्या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. तसेच जिल्हा परिषदेचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उपस्थितांसमोर औचित्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. राष्ट्रीय मिलिट्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना दिली.
प्रारंभी सर्व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. युवा शाहीर विक्रांत सिंग राजपूत यांचा देखील यावेळी केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. समारंभाचे प्रास्ताविक सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले. या समारंभाचे बहारदार सूत्रसंचालन विस्तार अधिकारी चंद्रशेखर जोशी व किरण वाघमारे सांगळोदकर यांनी केले.
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top