Distribution of RuPay on the Go (NCMC) cards soon : रुपे ऑन द गो (एनसीएमसी) कार्डचे वितरण लवकरच राज्य परिवहन सवलतीच्या तिकिटासाठी कार्ड अनिवार्य.

बुलढाणा : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागामार्फत सर्व सवलतधारी व विनासवलतधारी प्रवाशांसाठी रुपे ऑन द गो (एनसीएमसी) सक्षम वैयक्तिक कार्ड लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्डमुळे सवलतीचे तिकीट, पास टॉप-अप आणि डिजिटल वॉलेट सुविधा एकाच माध्यमातून मिळणार आहेत.
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, हे वैयक्तिक कार्ड असून त्यावर कार्डधारकाचे नाव व फोटो असेल. कार्ड अहस्तांतरणीय आहे. सवलतधारी तसेच सामान्य प्रवाशांना या कार्डचा वापर करता येईल. कार्डमध्ये सवलत सुविधा + ऑनलाइन वॉलेट + ऑफलाइन वॉलेट यांचा समावेश असेल.
तिकिट व वॉलेट सुविधा
बसमधील सवलतीचे तिकीट काढण्यासाठी कार्ड अनिवार्य राहील, ऑनलाइन वॉलेटमध्ये मोबाइल, नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे टॉप-अप करता येईल. आरक्षण (मोबाइल ॲप/पीओआरएस) व इतर व्यवहारांसाठी ऑनलाइन वॉलेटचा वापर शक्य आहे. ऑनलाइन वॉलेटमधील रक्कम ऑफलाइन वॉलेटला ट्रान्सफर करता येईल. बसमधील वाहकाद्वारे काढण्यात येणाऱ्या तिकीटासाठी ऑफर्लान वॉलेट वापरले जाईल. सवलतीचे तिकीट घेण्यासाठी ऑफलाइन वॉलेटमध्ये अपेक्षित भाड्याइतकी शिल्लक आवश्यक.
नोंदणी व वितरण
कार्ड नोंदणी/वितरण प्रक्रिया महामंडळाच्या २५१ आगारांतील अधिकृत एजंट, सुमारे ३३५ वाहतूक नियंत्रण कक्ष, तसेच एनएसडीएल पेमेंट बँकेद्वारे नियुक्त तीन हजार + एजंट यांच्यामार्फत राबविण्यात येईल. तपशील परिशिष्ट ‘अ’ मध्ये देण्यात येणार आहे.
देखभाल शुल्क
वॉलेट टॉप-अपवर ०.९ टक्के सुविधा शुल्क + वस्तू व सेवा कर आकारला जाईल. विद्यार्थी, मासिक, त्रैमासिक व इतर सर्व पासेसचे टॉप-अप ५० रुपयांच्या पटीत करणे आवश्यक, टॉप-अप सुविधा आगार/बसस्थानके, अधिकृत एजंट, संकेतस्थळ, मोबाइल ॲप व वाहकाच्या ईटीआय मशीनद्वारे उपलब्ध, आगार हद्दीबाहेरील एजंटमार्फत सेवांसाठी अतिरिक्त शुल्क लागू राहील.
कार्ड किंमत
नवीन नोंदणीकरिता १११ रुपये (सर्व करांसह), पूर्वीच्या स्मार्टकार्डधारकांनी जुने कार्ड जमा केल्यास १४९ रुपये, कार्ड हरवले/खराब झाल्यास १९९ रुपये (ऑफलाइन वॉलेटमधील शिल्लक परत मिळणार नाही), चुकीची छपाई/तांत्रिक दोष असल्यास विनामूल्य बदल.

