



व्यापारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चिखली : लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या वादातून संजीवनी वाघ यांच्यासह सहकाऱ्यांना मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून २३ फेब्रुवारीला चिखली येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदला सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना तसेच चिखलीकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शहरात सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ, किरकोळ दुकाने, व्यापारी आस्थापने व विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. प्रमुख चौकात निदर्शने करण्यात आली.
घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन नि:ष्पक्ष चौकशी करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
बंददरम्यान कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही. नागरिकांनीही सहकार्याची भूमिका घेतली.

