Three bribe takers arrested in treasury : अप्पर कोषागार अधिकाऱ्यांसह कनिष्ठ लेखापाल आणि लेखा लिपिकाने वृद्ध महिलेस वारंवार चकरा मारायला लावल्या. अखेर संतप्त झालेल्या मुलाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या मदतीने तिन्ही लाचखोरांना अद्दल घडविली.

पैशांसाठी मंजूर केले नाही पेन्शन : चकरा मारून आई वैतागली; मुलाने घडवून आणला ट्रॅप : कोषागार कार्यालयात एसीबीची कारवाई
बुलढाणा : सेवानिवृत्तीनंतर एका महिला कर्मचाऱ्याची पेन्शनची फाईल केवळ पैशांसाठी रोखून धरण्यात आली. काही ना काही पैसे उकळूच, या लालची भावनेने अप्पर कोषागार अधिकाऱ्यांसह कनिष्ठ लेखापाल आणि लेखा लिपिकाने वृद्ध महिलेस वारंवार चकरा मारायला लावल्या. अखेर संतप्त झालेल्या मुलाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या मदतीने तिन्ही लाचखोरांना अद्दल घडविली. शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी एसीबीच्या पथकाने जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये धाड घालून तिन्ही आरोपींना बेड्या टाकल्या.
सरकारी पगार घेऊनही वाम मार्गाने कमाई करण्याची सवय विविध शासकीय कार्यालयांमध्ये असलेल्या लाचखोरांना लागली आहे. नोट सरकवल्याशिवाय असे भामटे कामच करत नाहीत. विविध प्रकारे त्रास देऊन जनतेला लाच देण्यास प्रवृत्त करण्याची या लोकांची प्रवृत्ती आहे. तर अशा आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या भामट्यांना अद्दल घडविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागही कंबर कसून असतो. अप्पर कोषागार विभागाचे लाचखोरीचे प्रकरण दाखल होतात एसीबीच्या पथकाने कारवाई सुरू केली. २६ फेब्रुवारीला पडताळणी कार्यवाही पूर्ण झाली. यावेळी आरोपींनी लाच घेण्यास संमती दर्शविली.
पेन्शन मंजूर करण्यासाठी २० हजार रुपये मागण्यात आले. तडजोडीनंतर १५ हजार रुपये देण्याचे ठरले, तर पेन्शन मंजूर झाल्यानंतर उर्वरित ५ हजार रुपये द्यावे लागतील अशी अट घातली. तोपर्यंत इकडे तिन्ही आरोपींभोवती कारवाईचा फास आवळण्याची एसीबीची तयारी पूर्ण झाली होती.
शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एसीबीचे पथक जिल्हा कोषागार कार्यालयात धडकले. पंधरा हजारांची लाच घेताना अप्पर कोषागार अधिकारी प्रवीण मोंढे, कनिष्ठ लेखापाल विनोद घट्टे व लेखा लिपिक जीवन काळे यांना पकडण्यात आले.
पुण्याहून आला तक्रारकर्ता
या घटनेतील तक्रार करते हे पुणे येथे राहतात. त्यांच्या आईची पेन्शन केस कोषागार कार्यालयामध्ये टाकण्यात आली होती. परंतु पेन्शन मंजूर करणे ऐवजी त्यामध्ये खोडा घालत केवळ पैशांसाठी फाईल लटकवून ठेवण्यात आली. सेवानिवृत्तीनंतर महिला कर्मचाऱ्यास वेळोवेळी चकरा मारावयास लावणाऱ्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना अखेर मुलाने इंगा दाखविला.

