Hunger strike from March 1 to keep Malkapur Pangra Revenue Board in Sindkhedraj : येथील महसूल मंडळ साखरखेर्डा अप्पर तहसील कार्यालयात समाविष्ट न करता सिंदखेडराजा तहसील कार्यालयातच कायम ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मलकापूर पांग्रा : येथील महसूल मंडळ साखरखेर्डा अप्पर तहसील कार्यालयात समाविष्ट न करता सिंदखेडराजा तहसील कार्यालयातच कायम ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यापूर्वी सिंदखेड राजा एसडीओ व तहसीलदारांना सुद्धा निवेदन देण्यात आले होते. सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा मंडळातील मलकापूर पांग्रा, केशव शिवनी, वरदडी, बारलिंगा, देऊळगाव कोळ, कोनाटी, कुंबेफळ, ढोरवि, पोपळ शिवनी, वाघाळा, हिवरा गडलिंग, हनवतखेड, झोटिंगा, आगेफळ ही १४ गावे साखरखेर्डा व सिंदखेडराजा यांच्या मधोमध आहेत. अप्पर तहसील कार्यालय, नायब तहसीलदार साखरखेर्डा येथून तहसीलची काही कामे साखरखेर्डा येथे पार पडली. तालुका दंडाधिकारी तहसीलदार, खरेदी विक्री कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी, महावितरण कार्यालय, दिवाणी फौजदारी न्यायालय, उपविभागीय अधिकारी (एसडीओ), तालुका आरोग्य अधिकारी, आयसीडीएस, शिक्षण व इतर तालुकास्तरीय कार्यालयांसाठी नागरिकांना सिंदखेड राजा येथेच जावे लागणार आहे. त्यामुळे दुहेरी प्रवास करावा लागून वेळ व खर्च वाढणार व गैरसोय होणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या मलकापूर पांग्रा परिसरातील नागरिकांची विविध शासकीय कामे सिंदखेडराजा येथे एकाचवेळी पूर्ण होतात. मात्र साखरखेर्डा येथे सुरू होणारे अप्पर तहसील कार्यालय प्रारंभी वर्षानुवर्षे अपुऱ्या सुविधांसह कार्यरत राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांची गैरसोय वाढेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
प्रशासकीय सोय, ऐतिहासिक भावनिक नाते तसेच बाजारपेठ, आरोग्य, शैक्षणिक इत्यादी सोयी सुविधांसाठी जालना, देऊळगाव राजा, छत्रपती संभाजीनगर येथे नेहमी जाणे येणे होत असल्याचे लक्षात घेऊन साखरखेर्डा पूर्ण तालुका म्हणून घोषित होईपर्यंत मलकापूर पांग्रा मंडळाचा समावेश सिंदखेडराजा तहसीलमध्येच ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासकीय दृष्टिकोनातून नागरिकांच्या सोयीसाठी न्याय व योग्य असून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याबाबतील शासन आदेश पारित करावा; अन्यथा १ मार्चपासून सिंदखेडराजा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा ॲड. लुकमान शेख, शरद साळवे, डॉ दिनकर सोनुने माजी सरपंच वाघाळा, परमेश्वर खंदारे सरपंच कोनाटी, राजेश इंगळे सरपंच कुंबेफळ, अशोक कायंदे सरपंच देऊळगाव कोळ, नितीन पवार सरपंच ढोरवी, राजू गायकवाड माजी सरपंच जळगाव कोळ, अशोक वाघ सरपंच झोटिंगा, पार्वती यादव टाले सरपंच मलकापूर पांग्रा, गीता संतोष घाडगे सरपंच पोपळ शिवनी, रंजना विष्णू काकड सरपंच वाघाळा, कैलास साळवे, विठ्ठल मांजरे, सुभाष देशमुख, बाळू पवार, विजय सोनुने, गणेश डीघोळे, ज्ञानेश्वर वायाळ, प्रकाश दानवे यांच्यासह परिसरातील १४ गावातील सरपंच व नागरिक यांनी दिला आहे.

