Ayman and Madihas first fast; Pray for a ceasefire : येथील सहा वर्षीय मदीहा फिरदोस आणि आठ वर्षीय अयमन फिरदोस या बहिणींनी पवित्र रमजान महिन्यात १ मार्च रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा धरला.
बुलढाणा : येथील सहा वर्षीय मदीहा फिरदोस आणि आठ वर्षीय अयमन फिरदोस या बहिणींनी पवित्र रमजान महिन्यात १ मार्च रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा धरला. सायंकाळी उपवास सोडताना त्यांनी आपल्या भारत देशात शांती राहावी आणि इराण-इस्राएल यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम मिळावा, यासाठी विशेष प्रार्थना केली.


कमी वयात धार्मिक कर्तव्य बजावत असताना देशासाठी एकात्मता आणि जगासाठी सामाजिक शांतीचा अनोखा आदर्श या दोन्ही बहिणींनी घालून दिला. त्यांचा हा सामाजिक संदेश समाजात कौतुकास्पद ठरत आहे. अयमन आणि मदीहा दोन्ही बुलढाणा येथील पत्रकार कासिम शेख यांच्या मुली आहे.
रमजान हा इस्लामिक कॅलेंडरातील नववा महिना असून, मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात पवित्र कुरआन अवतरलेला असल्याने अल्लाहची विशेष कृपा प्राप्त होते. या काळात नेकीचे फळ बहुगुणित होते आणि इबादत, दानधर्म व आत्मशुद्धीवर भर दिला जातो. इस्लाम धर्मामध्ये ५ स्तंभ असून त्यापैकी रोजा हा देखील एक आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न, पाणी इत्यादी टाळून रोज धरला जातो. रोजाचा उद्देश आत्मसंयम, गरीबांची स्थिती अनुभवणे, पापांपासून दूर राहणे आणि अल्लाहशी जवळीक साधणे असतो. अयमन आणि मदीहा या लहान मुलींनी पवित्र रमजानमध्ये रोजा धरत शांती व एकतेचा संदेश दिला तसेच इराण-इस्राएल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रार्थना जागतिक शांततेसाठी प्रेरणा देणारी ठरत असून दोघींचे कौतुक होत आहे. यावेळी मोहल्ल्यातील लहान मुलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांनी विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.


