mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलढाण्यात लवकरच साकारणार बोधिसत्व ॲकॅडमी : Bodhisattva Academy to be established soon in Buldhana

शेअर करा :

Bodhisattva Academy to be established soon in Buldhana : बुलढाणा येथे लवकरच प्रशस्त अशी ‘बोधिसत्व ॲकॅडमी’ उभारण्यात येणार आहे. ज्ञानदानाच्या या खजिन्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सतीश पवार यांनी तब्बल दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 



सतीश पवार यांची दहा लाखांची मदत जाहीर

बुलढाणा : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी बुलढाणा येथे लवकरच प्रशस्त अशी ‘बोधिसत्व ॲकॅडमी’ उभारण्यात येणार आहे. ज्ञानदानाच्या या खजिन्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सतीश पवार यांनी तब्बल दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. भीमजयंती वैचारिक आणि साधेपणाने साजरी करून त्यावरील खर्च ॲकॅडमीसाठी देण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.

बहुजन समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी हक्काचे शैक्षणिक दालन निर्माण करणे हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत सतीश पवार यांनी व्यक्त केले. येत्या १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ॲकॅडमीचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती सतीश पवार यांनी दिली.

यंदाची १४ एप्रिल व्यसनमुक्त, डीजेमुक्त व प्रदूषणमुक्त साजरी करून समाजबांधवांनी होतकरू विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ‘बोधिसत्व ॲकॅडमी’ला आर्थिक व नैतिक पाठबळ द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सतीश पवार यांनी यापूर्वीही ‘मूकनायक फाउंडेशन’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले आहेत. तसेच तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या महान धम्माचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी जागतिक धम्म परिषदांचे आयोजन करून समाजप्रबोधनाचे कार्य त्यांनी केले आहे. समाजातील गरीब रुग्णांसाठी त्यांनी अम्बुलन्स सेवा सुरू करून आरोग्य क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठीही सतीश पवार प्रयत्नशील आहेत.

शाळा वाचवा अभियान

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या सरकारी शाळा पटसंख्येअभावी बंद पडू नयेत, यासाठी त्यांनी लोकजागृत्तीद्वारे व्यापक लोकचळवळ उभी करण्याचे अभियान सुरू केले आहे. राज्य सरकारच्या नकारात्मक धोरणांविरोधात राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याची मोहीमही त्यांनी हाती घेतली आहे. सरकारी शाळा वाचविण्याच्या आंदोलनाला दिशा व नियोजन देण्यासाठी ‘शाळा वाचवा कृती समिती’ची स्थापना करण्यात आली असून, या मोहिमेला महाराष्ट्र‌भरातील वैचारिक वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

विद्यार्थ्यांना सक्षम मार्गदर्शन
‘बोधिसत्व ॲकॅडमी’मुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना सक्षम मार्गदर्शन व अभ्यासाचे योग्य वातावरण उपलब्ध होणार असून, हा उपक्रम बुलढाणा जिल्ह्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top