Heat wave in Vidarbha; Akola, Amravati, Wardha heat up : यंदा उन्हाळा मार्चच्या मध्याआधीच कडक तापला आहे. विदर्भात दोन दिवस उष्णतेची लाट असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्याने उन्हाच्या पाऱ्याची चाळीशी ओलांडली आहे.

हवामान खात्याचा सावधानतेचा इशारा
बुलढाणा : यंदा उन्हाळा मार्चच्या मध्याआधीच कडक तापला आहे. विदर्भात दोन दिवस उष्णतेची लाट असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्याने उन्हाच्या पाऱ्याची चाळीशी ओलांडली आहे. अजून तर एप्रिल आणि मे महिन्यातील उन्हाची परीक्षा येणे बाकी आहे. आताच एवढे उन्ह आहे, माग पुढे काय हाल होतील, अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे.
भारत हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेची (Heat Wave) चेतावणी जारी केली आहे. तसेच विदर्भातील इतर भागांमध्येही कमाल तापमान सामान्यापेक्षा सुमारे ३–४°से. अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
नागरिकांनी सतर्क राहून हवामान विभागाच्या पुढील सूचना व अद्ययावत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन भारत हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्राने केले आहे.
उष्णतेच्या लाटेदरम्यान घ्यावयाची काळजी (IMD मार्गदर्शक तत्त्वे) :
* शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर जाणे टाळावे.
* पुरेसे पाणी प्या, तहान नसली तरी नियमितपणे द्रवपदार्थ घ्यावेत.
* हलके, सैल आणि फिकट रंगाचे सूती कपडे परिधान करावेत.
* बाहेर पडताना टोपी, छत्री किंवा ओला कापड वापरून डोके झाकावे.
* मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड पेये कमी प्रमाणात घ्यावीत, कारण त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता वाढू शकते.
* लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
* जनावरांना सावलीत ठेवावे व त्यांना पुरेसे स्वच्छ पाणी द्यावे.
* उष्माघाताची लक्षणे (डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, जास्त घाम येणे) जाणवली तर त्वरित सावलीत विश्रांती घ्यावी व आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घ्यावी.
७ मार्चचे तापमान
अकोला – ४०.८
अमरावती – ४०.६
भंडारा – ३७.४
बुलढाणा – ३७.२
चंद्रपूर – ३८.८
गडचिरोली – ३८.२
गोंदिया – ३६.६
नागपूर – ३७.८
वर्धा – ४०
वाशीम – ३९.२
यवतमाळ – ३८.४


