Dhamma gathering on March 30 at Tembhurna : टेंभुर्णा येथे तपवन बुद्धविहारात ३० मार्च २०२६ रोजी आयोजित भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य धम्म मेळावा घेण्यात येत आहे.

हजारोंचे संख्येने सामील व्हा : के.के. शेगोकार यांचे आवाहन : धम्म समारंभाचे पोस्टर प्रकाशन उत्साहात
खामगाव : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अकोला येथे आयोजित धम्म मेळाव्याची राज्यभरात नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे टेंभुर्णा येथे तपवन बुद्धविहारात ३० मार्च २०२६ रोजी आयोजित भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य धम्म मेळावा घेण्यात येत आहे. हा मेळावा यशस्वी करण्याकरिता हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष ( उत्तर ) के.के .शेगोकार यांनी केले आहे.
खामगाव येथील नगर परिषद मैदानाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ७ मार्चला धम्म समारंभाचे पोस्टर प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथे ३० मार्चला होणाऱ्या एक दिवसीय धम्म समारंभाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाला बहुजनांचे श्रद्धास्थान श्रद्धेय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
धम्म समारंभ पोस्टर प्रकाशनावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, पुज्य भन्ते राजज्योती, खामगाव तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे, जळगाव जामोद तालुकाध्यक्ष देवा दामोदर, संग्रामपूर युवा तालुकाध्यक्ष आशिष धुंदळे, वैशाली इंगळे, भारतीय बौद्ध महासभेचे खामगाव तालुकाध्यक्ष विनेश इंगळे, शहराध्यक्ष दादाराव हेलोडे, जिल्हा हिशोब तपासणी तुकाराम रोकडे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. यावेळी विविध तालुक्यातील व जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


